26/11 च्या गुन्हेगाराचे कॅनडाचे नागरिकत्व रद्द होणार
चुकीची माहिती दिल्याचा तहव्वुर राणावर आरोप
वृत्तसंस्था/ ओटावा
मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा गुन्हेगार तहव्वुर हुसैन राणाचे कॅनडाचे नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राणाने नागरिकत्व अर्जावेळी वास्तव्यासंबंधी खोटी माहिती दिली होती असा आरोप कॅनडा सरकारने केला आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी हे 26 फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर कॅनडाची ही कारवाई दोन्ही देशांच्या संबंधांना रीसेट करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी जस्टिन ट्रुडो सरकारदरम्यान भारत-कॅनडा संबंध तणावपूर्ण राहिले होते.
इमिग्रेशन, रिफ्यूजीज अँड सिटिजनशिप कॅनडानुसार (आयआरसीसी) राणाचे नागरिकत्व दहशतवादाच्या आरोपांमुळे नव्हे तर खोटी माहिती दिल्याच्या आधारावर रद्द करण्यात येणार आहे. राणाने 2000 साली नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. अर्ज करण्यापूर्वी 4 वर्षांपर्यंत ओटावा आणि टोरंटोमध्ये वास्तव्य केल्याचा आणि यादरम्यान केवळ 6 दिवस देशाबाहेर राहिल्याचा दावा केला होता.
तर रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांच्या (आरसीएमपी) चौकशीत तहव्वुर हा बहुतांश काळ शिकागोत होता असे आढळून आले. शिकागो येथे तहव्वुरच्या अनेक संपत्ती आणि व्यवसाय होते. तहव्वुरने खोटी माहिती देत गंभीर अन् जाणूनबुजून फसवणूक केल्याचे आयआरसीसीने म्हटले आहे. खोट्या माहितीमुळे तो नागरिकत्वाच्या पात्रतेच्या अटी पूर्ण करत असल्याचे अधिकाऱ्यांनी मानले होते असे विभागाचे सांगणे आहे.
तहव्वुरच्या नागरिकत्वाशी संबंधित प्रकरणी आता फेडरल कोर्ट ऑफ कॅनडा अंतिम निर्णय घेणार आहे. आयआरसीसीच्या निर्णयाला राणाच्या वकिलांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. तर तहव्वुर राणाचे अमेरिकेकडून भारताला प्रत्यार्पण करण्यात आले होते. राणा सध्या भारतात 26/11 हल्ल्यांप्रकरणी सुनावणीला सामोरा जात आहे. 2008 च्या या दहशतवादी हल्ल्यात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.