For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रेयसीच्या चेहऱ्यावर प्रियकराच्या नावाचे 250 टॅटू

06:11 AM Apr 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रेयसीच्या चेहऱ्यावर प्रियकराच्या नावाचे 250 टॅटू
Advertisement

कुठल्याही नात्यात विश्वास सर्वात मजबूत आधार मानला जातो. परंतु हे नाते भय, दबाव आणि हिंसेत बदलले तर ते माणसाची ओळखही हिरावून घेते. काहीसा असाच प्रकार नेदरलँडच्या एका महिलेसोबत घडला आहे. जोक असे नाव असलेल्या महिलेच्या प्रियकराने जबरदस्तीने तिच्या शरीरावर 250 वेळा स्वत:च्या नावाचा टॅटू काढला होता. या दुष्ट प्रियकराने स्वत:च्या प्रेयसीच्या शरीराला जवळपास पूर्णपणे टॅटूने झाकोळून टाकले होते. जोकचा चेहरा जवळपास पूर्णपणे दाट रंगाच्या शाईने झाकला गेला होता. यात तिचा चेहरा आणि मानेवरही ‘हंस’ नाव लिहिले होते, जे तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराचे आहे.

Advertisement

प्रेमाच्या नावाखाली क्रौर्य

पूर्वाश्रमीच्या प्रियकराने अनेक वर्षांपर्यंत मला मानसिक आणि शारीरिक स्वरुपात त्रास दिला. त्याने एक स्वस्त ऑनलाइन टॅटू मशीन खरेदी करत माझ्या शरीरावर 250 हून अधिक टॅटू निर्माण केले. यात बहुतांश करून त्याचे नाव किंवा त्याच्या नावाचे पहिले अक्षर कोरलेले होते अशी तक्रार जोकने पेली आहे.

Advertisement

जोकच्या शरीराचा जवळपास 90 टक्के हिस्सा या टॅटूने झाकोळून गेला होता. चेहरा, मान, शरीराच्या अन्य हिस्स्यांवरही त्याने जबरदस्तीने टॅटू काढले होते. ती जणू माणूस नव्हे तर स्वत:ची मालकी संपत्ती असल्याप्रमाणे प्रियकर वागला होता.

भय, दबाव, अन तुटणारे जीवन

जोकनुसार तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर तिला सातत्याने धमकावित, घाबरवत आणि नियंत्रित करत होता. हळूहळू ती इतकी कमजोर झाली की तिने स्वत:ला मद्य आणि ड्रग्जच्या नशेत बुडवून घेतले. या स्थितीत ती स्वत:साठी आवाज उठविण्याच्या स्थितीतही राहिली नाही. हे टॅटू केवळ स्वत:चे नियंत्रण आणि अधिकार दर्शविण्याची क्रूर पद्धत होती असे स्पिज्ट वॅन टॅटू किंवा टॅटू रिग्रेट या डच संघटनेशी संबंधित एंडी हान यांनी म्हटले आहे.

कायदाही हतबल

जोकने स्वत:सोबत या छळाची तक्रार पोलिसांकडे केली, परंतु हे प्रकरण सिद्ध करणे अवघड ठरले. टॅटू जोकच्या सहमतीने काढण्यात आले होते असा दावा आरोपीने केला. कुठलाही समजुतदार व्यक्ती डोळे, नाक किंवा कान यासारख्या हिस्स्यांवर स्वत: टॅटू काढून घेणार नाही, परंतु कायदेशीर स्वरुपात हे सिद्ध करणे सोपे नव्हते असे हान सांगतात.

एका नव्या सुरुवातीचा प्रयत्न

या भयावह कहाणीदरम्यान टॅटू रिग्रेट नावाच संघटना जोकसाठी आशेचा किरण ठरली. जोकच्या मदतीसाठी अभियान राबविण्यात आले आणि 35 हजार डॉलर्सहून अधिक रक्कम जमविण्यात आली. आता जोकवर उपचार सुरू असून तिच्या शरीरावरील टॅटू हळूहळू हटविले जात आहेत. तिच्या चेहऱ्यावरील बहुतांश खुणा मिटविण्यात आल्या आहेत, याचबरोबर तिची गमावलेली ओळखही परतत आहे.

वेदनेपासून आशेपर्यंत

जो माणूस मोठ्या आघातांना सामोरा जाते, तो पुन्हा उभा राहू शकतो. जर मी हे करू शकते, तर कुणीही करू शकते असे जोक सांगते. शिल्लक  रकमेतून घरगुती हिंसेच्या अन्य पीडितांसाठी मदत दिली जाईल, जेणेकरून लोक स्वत:च्या भूतकाळातील जखमांमधून बाहेर पडत एक नवी सुरुवात करू शकतील असे संघटनेचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.