२५ वर्ष विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांचा सत्कार!
कोल्हापूर प्रतिनिधी
स्वतंत्रतदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने 25 वर्ष विनाअपघात सेवा देणाऱ्या आठ चालकांचा सत्कार केला. ध्वजारोहन कार्यक्रमानंतर विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या हस्ते करण्यात आला.
एसटीचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे चालक आहे. बसमधील प्रवाशांना सुरक्षित बस सेवा देण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. अशा 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष व 20 वर्ष सुरक्षितसेवा बजावलेल्या चालकांचा दरवर्षी महामंडळामार्फत सुरक्षितसेवेचा बिल्ला देवून आगार पातळीवर गौरव करणेत येतो. तर 25 वर्ष विनाअपघात सेवा बजावलेल्या चालकांना 25 हजार रोख बक्षीस सपत्निक साडी व खण देवून सत्कार विभागीय कार्यालय किंवा मध्यवर्ती कार्यालय येथे करण्यात येतो. यावर्षों कोल्हापूर विभागामध्ये 25 वर्ष विनाअपघात सेवा बजावलेल्या 8 चालकांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यामध्ये कोल्हापूर आगारातील चालक साताप्पा पिराजी दाभाडे, इचलकरंजी विभागाचे दिपक शिवराम वाईकर, गारगोटीचे पांडूरंग शामराव कळंत्रे, गारगोटीची विलास दिनकर पाटील, कुरूंदवाडचे सुनील गुलाब भंडारे, कुरूंदवाडचे कृष्णा शामराव जगताप, आजऱ्याचे रोहिदास परसू चव्हाण, आजऱ्याचे विठ्ठल बाळु नाईक या चालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यंत्र अभियंता यशवंत कानतोडे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, कामगार अधिकारी संदीप भोसले आदी उपस्थित होते.