राजापुरात 'जलजीवन'ची २५ टक्के कामे पूर्ण
राजापूर :
हर घर जल अंतर्गत जलजीवन मिशन योजना २०१९ मध्ये सुरू झाल्यानंतर आतापर्यंत या योजनेला जवळपास तीनवेळा मुदतवाढ मिळालेली असताना राजापूर तालुक्यात केवळ २५ टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यामध्ये मंजूर झालेल्या ११२ कोटी रुपये निधीतून २०० महसूली गावांमध्ये सध्या कामे सुरू आहेत. त्यापैकी ५० गावे सध्या हर घर जल म्हणून घोषित झाली आहेत. तर, निर्धारित कालावधीमध्ये कामे पूर्ण होऊन दिडशे गावांना हर घर जल म्हणून घोषित होण्याची प्रतिक्षा आहे. घरोघरी नळ कनेक्शद्वारे मुबलक पाणीपुरवठा करणारी जलजीवन मिशन योजना ही महत्वाकांक्षी योजना शासनातर्फे राबविली जात आहे. या योजनेचा तालुक्यामध्ये सर्वेक्षण होऊन आराखडा तयार करण्यात आला.
त्याची ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे अंमलबजावणी केली जात आहे. सप्टेंबर २०२४ पर्यंत जलजीवन मिशन योजना पूर्ण करण्याचा निर्धार शासन आणि प्रशासनाने केला होता. मात्र, निर्धारित कालावधीमध्ये कामे पूर्ण होऊन शकल्याने आता मार्च २०२५ अखेर जलजीवन मिशन योजनेतील सर्व कामे पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
तालुक्यामध्ये मंजूर झालेल्या ११२ कोटी रूपये निधीतून २०० महसूली गावांमध्ये सध्या कामे सुरू आहेत. त्यापैकी ५० गावे सध्या हर घर जल म्हणून घोषित झाली आहेत. यामध्ये शिवणेखुर्द, बुरंबेवाडी, बाकाळे, दसूरवाडी, पोकळेवाडी, चिखलगाव, पाजवेवाडी, निवेली, तेरवण, थोरलीवाडी, साखर, येरडव, गोठीवरे, कारवली, कशेळी-वरचीवाडी, दसूर, कोंभे, सागवे पालये, खिणगिणी, जैतापूर-बाजारवाडी, सौंदळ-मुसलमानवाडी, नाणार-वाडीचिवारी, कुंभवडे हरचलेवाडी, कुंभवडे, डोंगर-दत्तवाडी, मठखुर्द, सोलगाव, कुवेशी तुळसुंदेवाडी, वाडावेत्ये, गोठणे दोनिवडे, वावूळवाडी, बारसू, भाबलेवाडी, निखरेवाडी, कोदवली-मांडवकरवाडी, मोगरे, केरावळे, सागवे जांभारी, देवीहसोळ, कोंडसर बुद्रुक, बेनगी, वडदहसोळ खालचीवाडी, पळसमकरवाडी, करेल, डोंगर-मुसलमानवाडी, परटवली या गावांचा समावेश आहे.
या कामांकरीता ३० कोटी रुपये खर्च झाला असून सद्यस्थितीत ४२ कामे प्रगतीपथावर आहेत. तालुक्यात केवळ २५ टक्के काम पूर्ण झालेले असताना निर्धारित कालावधीमध्ये कामे पूर्ण होऊन दिडशे गावांना हर घर जल म्हणून घोषित होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, निर्धारित कालावधीमध्ये शंभर टक्के कामे पूर्ण करून सर्व गावे हर घर जल म्हणून घोषित करणे प्रशासनासमोर आव्हान ठाकले आहे. मार्च अखेरपर्यंत जलजीवन मिशन योजनेतील सर्व कामे पूर्ण करण्यावर शासन आणि प्रशासनाचा भर असून त्यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गेल्या सुमारे सात-आठ महिन्यापासून जल जीलवन मिशन योजनेचा पुरेसा निधी आलेला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
नळपाणी योजनेचे काम पूर्ण करायचे झाले तर, त्यासाठी साहित्य खरेदीसह कामगारांची मजुरीसाठी पुरेसा पैसा हातामध्ये असणे गरजेचे आहे. मात्र, निधीच उपलब्ध नसले तर, या खर्च भागवायचा कसा आणि कामे पूर्ण करायची कशी असा सवाल ठेकेदार उपस्थित करत आहेत.