कर्नाटक आगाराची एसटी उलटून 25 जखमी
मिरज/म्हैसाळ :
तालुक्यातील म्हैसाळ येथे कागवाड रस्त्यावर ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना कर्नाटक आगाराची एसटी सुमारे 30 फुट खोल खड्ड्यात उलटल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या एसटीमधून सुमारे 40 ते 45 प्रवासी प्रवास करत होते. एसटी चालकासह 11 मfिहला व 12 पुरूष प्रवाशांसह नऊ महिन्याचे एक बालक असे 25 जण जखमी झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र, चालकाचा पाय मोडला आहे. अपघातानंतर स्थानिक तरुणांनी बचावकार्य राबवत एसटीत अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. दरम्यान, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी मिरज शासकीय रुग्णालयास भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, कर्नाटक आगाराची एसटी (केए-23-एफ-1005) म्हैसाळ मार्गे कागवाडकडे जात होती. म्हैसाळपासून काही अंतरावर स्मशानभूमीजवळून एसटी जाताना समोरुन कागवाड मार्गे म्हैसाळकडे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एमएच-10-डीएन-9557) येत होता. सदर ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी चालकाने बेदरकार एसटी चालवून अचानक रस्त्याकडेला ब्रेक मारला. त्यामुळे एसटी व ट्रॅक्टरची धडक होऊन एसटीवरील चालकाचे नियंत्रण सुटून एसटीचे पुढील चाक रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात सरकले. काही क्षणात पूर्ण एसटीच उलटली झाली. दोन कोलांटी घेऊन एसटी सुमारे 30 फुट अंतरावऊन खोल खड्ड्यात पडली.
या अपघातानंतर अन्य वाहनधारकांसह काही ग्रामस्थांनी घटनास्थळी धांव घेतली. एसटी पलटी होऊन 40 ते 45 प्रवाशी आतच अडकले होते. यामध्ये महिला प्रवाशीही मोठ्या संख्येने होत्या. सर्व प्रवासी जोरात आरडाओरडा करत होते. म्हैसाळ गावातील स्थानिक तरुणांनी तातडीने बचाव कार्य राबवून एसटीत अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. यातील 11 महिला व 12 पुरूष प्रवाशांसह नऊ महिन्याचे एक बालक किरकोळ जखमी झाले होते. एसटी चालकाचाही पाय मोडला. जखमी चालकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरीत जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस व वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त एसटी खड्ड्यातून बाहेर काढली. अपघात पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. म्हैसाळपासून कर्नाटक सीमेच्या कागवाड हद्दीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. जखमी प्रवाशांपैकी चौघांना उपचारानंतर सोडण्यात आले असून, उर्वरीत 20 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती सुस्थितीत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
- जखमींची नांवे अशी
जखमी झालेल्यांमध्ये रझिया बागवान (वय 50), रवी चव्हाण (वय 30), आप्पू कुबेर (वय 22), कल्पना जाधव (वय 55), मल्लाम्मा येट्टनूर (वय 39), शांताबाई चव्हाण (वय 60), कविता चव्हाण (वय 35), राजेंद्र धुना (वय 50), गिरीजाम्मा कुड्डी (वय 60), श्रीपाद खोत (वय 85), प्रज्ञा खोत (वय 45), शिवाजी चव्हाण (वय 73), इम्रान अहमद (वय 40), अर्जून कोळी (वय 43), सोनाक्का बंडगर (वय 35), फमिरा लोहानी (वय 51), बसवराज तनवारे (वय 34), शिवलिंग बालाजी (वय 50), अरबाज कुडचीकर (वय 23), अफसाना कुडचीकर (वय 20), राजू (वय 30), रज्जाक बागवान (वय 66) आणि प्रितम तन्वारे (वय 9 महिने) अशा 24 प्रवाशांचा समावेश आहे. तर जखमी चालक हा खासगी ऊग्णालयात उपचार घेत असल्याने रात्री उशिरापर्यंत त्यांचे नाव समजले नाही.
- अति घाई संकटात नेई
या अपघातात एसटी चालकाकडून चूक झाल्याचे प्रकर्षाने दिसून आले. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, म्हैसाळ-कागवाड रस्त्यावर विशेष कऊन कर्नाटक आगाराच्या एसटी बसेस बेदरकारपणे धावतात. एसटी चालक वारंवार ओव्हरटेक करत भरधाव वाहने चालवितात. चालकांच्या अतिघाईमुळे यापूर्वीही अशाच प्रकारे अनेक अपघात झाले आहेत. या अपघातातही एसटी चालकाचीच चूक आहे. ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर नियमानुसार एकेरी मार्गावऊन सावकाश येत होता. मात्र, एसटी चालकाने भरधाव वेगात ओव्हरटेकच्या नादात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत ओव्हरटेक मारण्याचा प्रयत्न केला. त्यातच ट्रॅक्टरला धडक बसून, एसटी पलटी झाली, असे घटनास्थळी प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.