ई-सिगारेट प्रकरणी परागला 25 टक्के दंड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मुल्लानपूर येथे पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यादरम्यान ‘व्हेपिंग‘ (ई-सिगारेट) केल्याबद्दल राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागला गुरुवारी सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला. त्याने आपल्या कृतीमुळे खेळाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली, असे मानले गेले. परागला, पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्याच्या थेट प्रसारणादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये ‘ई-सिगारेट‘ (ज्याला ‘वेपिंग‘ असेही म्हणतात) ओढताना पाहिले गेले.
मंगळवारी रात्री रॉयल्सच्या फलंदाजीच्या वेळी परागने केलेल्या कृतीवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. वृत्तसंस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, मैदानावरील पंच (ऑन-फील्ड अंपायर्स) तन्मय श्रीवास्तव आणि नितीन मेनन यांनी सामना संपताच या प्रकरणाची तक्रार सामनाधिकारी अमित शर्मा यांच्याकडे केली नव्हती.
या सामन्यातील दृश्य पुरावे पाहिल्यानंतरच त्यांनी ती तक्रार केली त्यानंतर शर्मा यांनी आयपीएलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी परागला दोषी ठरवले. या ‘स्तर 1’ च्या गुह्यासाठी सामन्याच्या शुल्कातून 25 टक्के कपात आणि एक ‘डिमेरिट पॉइंट‘ (दोषगुण) अशी शिक्षा असते. रियानने आपला गुन्हा कबूल केला असून, सामनाधिकारी अमित शर्मा यांनी ठोठावलेली शिक्षाही त्याने मान्य केली आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे.
आयपीयलची प्रतिष्ठा अबाधित राहावी यासाठी, दोषी संघ, त्याचे अधिकारी आणि खेळाडू यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी इतर पर्यायांचा विचार बिसीसीआय कडून केला जात आहे, असेही या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे.
राजस्थान रॉयल्सवर संभाव्य कारवाईबाबत जेव्हा बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा ते म्हणाले, निवेदनात स्पष्टपणे नमूद केल्याप्रमाणे, आम्ही त्या संघावर नेमकी कोणती कारवाई करावी, याचा विचार करत आहोत. याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.