कळंगुटमध्ये 25 दलालांची धरपकड
एकूण 1.25 लाखांची रक्कम वसूल
प्रतिनिधी/ म्हापसा
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कळंगुटमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोमवारी सकाळी कळंगुट पोलिसांनी पर्यटक पोलिसांच्या मदतीने 25 दलालांना पकडले. या दलालांवर पर्यटन खात्याने दंडात्मक कारवाई केली आणि दंड म्हणून 1.25 लाखाची रक्कम वसूल केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक जतिन पोतदार व निरीक्षक परेश नाईक यांनी दिली.
कळंगुट पोलिसस्थानकाच्या हद्दतील कळंगुट, बागा, सिकेरी व कांदोळी या समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांना दलालांकडून नेहमीच त्रास होतो. बेकायदा व्यवसाय करणाऱ्या या दलालांची पोलिसांकडून वेळोवेळी धरपकड केली जात होती. तरीही या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात दलालांचा वावर सुरूच होता. कळंगुट समुद्रकिनारी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांना या दलालांकडून त्रास होऊन नये यासाठी कळंगुटचे पोलिस निरीक्षक परेश नाईक व पर्यटक पोलिस निरीक्षक जतिन पोतदार यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पोलिसस्थानकांच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेतली.
या मोहिमेंतर्गत 25 दलालांना पकडण्यात आले. चौकशी करून या दलालांना पोलिसांनी पर्यटन खात्याच्या संचालकांसमोर हजर केले. पर्यटन कायद्यानुसार प्रत्येकी 5 हजार रूपये, याप्रमाणे या 25 जणांकडून 1 लाख 25 हजार रूपये पर्यटन खात्याने दंडात्मक रक्कम म्हणून त्यांच्याकडून वसूल केली आहे.
नववर्षानिमित्त गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना त्रास होऊ नये म्हणून पोलिसांनी या दलालांवर ही कारवाई केली आहे.
दरम्यान चार दिवसापूर्वी कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर बोट दुर्घटना घडली होती, तेव्हा स्थानिक आमदार मायकल लोबो यांनी येथे समुद्रकिनाऱ्यावर बंदर कप्तान खाते व पर्यटक अधिकाऱ्यांच्या समक्ष पोलिसांना येथील दलालांना हाकलून लावा अशी सूचना केली होती. त्याला अनुसरून ही कारवाई करण्यात आली. दोघा पंच सदस्यांच्या आशीर्वादाने येथे वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय सुरू असून यासाठी या पंचानी या दलालांना आपल्याजवळ बाळगल्याचे येथील सूत्रांनी सांगितले.