जिल्ह्यात 24 हजार हेक्टर क्षेत्राला फटका
तब्बल 41.75 कोटी रुपयांचे नुकसान : शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत
बेळगाव : जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे 24 हजार 777 हेक्टरावरील शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. 24 हजार हेक्टरावरील नुकसान झाल्याने तब्बल 41.75 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. कृषी आणि महसूल विभागाने संयुक्तपणे सर्व्हेक्षणाचे काम केले आहे. शिवाय महसूल विभागामार्फत नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र भरपाई देण्यास शासनाकडून दिरंगाई होऊ लागली आहे, असा संतापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
मुसळधार पावसामुळे ऊस, भात, चवळी, मका, भुईमूग, उडीद, सुर्यफूल, सोयाबीन, कापूस आणि भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. विशेषत: नदीकाठावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी पिके कुजल्याने फटका बसला आहे. तर काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. नदीकाठावरील शेतकऱ्यांचे पूर्णपणे पीक वाया गेले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शासनाच्या भरपाईकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
सरकारकडे अहवाल सादर
पीक नुकसानीचा सर्व्हे करून सरकारकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. भरपाईची रक्कम लवकरच जारी केली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर भरपाई जमा केली जाईल.
- मोहम्मद रोशन, जिल्हाधिकारी