रोहयोअंतर्गत 24 हजार हातांना काम
शेती कामामुळे लाभार्थ्यांमध्ये घट : महिन्याभरात वाढणार मागणी
बेळगाव : असंघटित कामगारांसाठी महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहयोअंतर्गत काम करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या घटली आहे. सद्यस्थिती केवळ 24 हजार 902 लाभार्थी जिल्ह्यात विविध ठिकाणी काम करीत आहेत. सुगी रब्बी हंगामाचा परिणाम रोहयो कामावर झाला आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने पाणीपातळी टिकून आहे. त्यामुळे शेतकरी कामगारांना स्थानिक पातळीवर काम उपलब्ध झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत रोहयो कामाकडे कल कमी झाला आहे.
विशेषत: एप्रिल, मे महिन्यात जिल्ह्यात 1 लाखाहून अधिक रोहयो कामगार दररोज काम करतात. मात्र ही संख्या आता 24 हजारावर खाली आली आहे. रोहयोअंतर्गत रस्ते, तलाव, नाले, शेततळे, पाणंद रस्ते आणि इतर विकासकामे राबविली जात आहेत. विशेषत: सर्व लाभार्थ्यांना काम उपलब्ध व्हावे यासाठी ऑनलाईन अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. मात्र सध्या बेळगाव, खानापूर तालुक्यात सुगी हंगामाला जोर आला आहे. त्यामुळे रोहयोकडे दुर्लक्ष झाले आहे. सुगी हंगामानंतर रोहयोची मागणी वाढणार आहे. मात्र जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये रोहयोचे काम सुरू झाले आहे. मात्र सद्यस्थितीत रोहयोच्या कामाकडे कल कमी दिसून येत आहे.
रोहयो अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 100 दिवस काम देणे बंधनकारक आहे. शिवाय अलिकडे कामगारांच्या मजुरीतही वाढ करण्यात आली आहे. प्रतिदिवस 349 रुपये मजुरी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे गतवर्षी रोहयोअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांची संख्याही मोठी होती. शिवाय गतवर्षी पावसाअभावी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे रोहयोला कामगारांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र यंदा दमदार पावसामुळे स्थानिक पातळीवर शेतीत कामे उपलब्ध झाली आहेत.
शेती कामामुळे कामगारांची संख्या कमी
जिल्ह्यात सर्वत्र रोहयोअंतर्गत कामे सुरू आहेत. सद्यस्थितीत 24 हजार 902 कामगार कामे करीत आहेत. सध्या शेती आणि इतर कामामुळे कामगारांची संख्या कमी आहे. मात्र येत्या महिनाभरात पुन्हा कामाची मागणी वाढणार आहे.
- राहुल शिंदे (सीईओ जि. पं.)