हरियाणात 24 अधिकारी अन् कर्मचारी निलंबत
शेतात काडीकचरा जाळण्याच्या घटनांप्रकरणी कारवाई
वृत्तसंस्था/ सोनिपत
हरियाणात कृषि विभागाच्या 24 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने मंगळवारी 24 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. यात कृषी विकास अधिकारी, कृषी निरीक्षक देखील सामील आहेत. प्रदूषण रोखण्यास अपयशी ठरल्याप्रकरणी राज्य सरकारने ही कारवाई केली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना शेतात काडीकचरा जाळण्याच्या घटना रोखण्यासाठी तैनात करण्यात आले होते. परंतु त्यांना हे प्रकार रोखता आले नव्हते. काडीकचरा जाळण्यापासून रोखण्यास अपयशी ठरल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा सरकारसोबत पॅनल कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटला देखील फटकारले होते. याचबरोबर दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांना 23 ऑक्टोबर रोजी सुनावणीस हजर राहण्याचा निर्देश दिला होता. यापूर्वीच हरियाणा सरकारने मोठी कारवाई केली आहे. पंजाब आणि हरियाणा सरकारने शेतात काडीकचरा जाळणाऱ्यांच्या विरोधात कुठलीच कारवाई केलेली नाही असे सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात म्हटले होते. पंजाब सरकारने तर मागील तीन वर्षांमध्ये एकही खटला चालविला नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते.