For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विठ्ठल-रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू

10:10 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू
Advertisement

भाविकांना मिळणार सुलभ दर्शन 

Advertisement

पंढरपूर : वारकरी संप्रदायाचा भक्ती सोहळा असलेला आषाढी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. साधूसंतांच्या पालख्या या सोहळ्यासाठी पंढरीकडे निघालेल्या आहेत. यामुळे पंढरीत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.  भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून श्री विठ्ठल-ऊक्मिणी मातेचे दर्शन आजपासून 24 तास सुरू करण्यात आले आहे. यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून दिवसेंदिवस दर्शन रांगेमध्ये भाविकांची गर्दी वाढत आहे, अशी माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून ‘श्रीं’चा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षी 7 जुलै रोजी चांगला दिवस असल्याने विधिवत पूजा करून ‘श्रीं’चा पलंग काढण्यात आला. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोडतर तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेचे 24 तास मुखदर्शन, तर 22.15 तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

Advertisement

‘श्रीं’ चा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती बंद होवून नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. 26 जुलै रोजीच्या प्रक्षाळपूजेपर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध असणार आहे. ‘श्री’ चा पलंग काढताना पूजेवेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी, बलभीम पावले व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय, दर्शनरांगेत बॅरिकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालिन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर वाटप करण्यात येत आहे. दर्शन रांगेतील भाविकांची गर्दी लक्षात घेता दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालवून भाविकांना जलद व सुलभ दर्शन देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

दिवसभरात लाखभर भाविकांचे होणार दर्शन 

आजपासून एका मिनिटात 30 ते 35 भाविक विठ्ठलाचे पददर्शन घेतील. तर दररोज एक लाखाच्या आसपास भाविक मुखदर्शन घेणार आहेत. आजपासून व्हीआयपी दर्शन बंद असणार आहे. सर्वसामान्य व वारकऱ्यांना जास्तीत जास्त दर्शनाचा लाभ मिळण्यासाठी श्री विठ्ठल- ऊक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरु केले आहे.

Advertisement
Tags :

.