शास्त्रीनगरात 24 तास पाणीपुरवठा
काही भागात पुरवठा : 2025 पर्यंत 24 तास पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट
बेळगाव : शहरात 24 तास पाणीपुरवठ्यासाठी एलअँडटीकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. सद्यस्थितीत मुत्यानट्टी, आरसीनगर, कणबर्गी व शास्त्रीनगरातील काही भागांमध्ये 24 तास पाण्याचा पुरवठा केला जात आहे. शहरातील सर्वच भागांमध्ये 2025 पर्यंत 24 तास पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट एलअँडटीने ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये जलवाहिन्या घालण्याचे काम गतीने सुरू आहे. शहरातील दक्षिण भागात वडगाव, शहापूर, भारतनगर, खासबाग, राणी चन्नम्मानगर, टिचर्स कॉलनी आदी ठिकाणी 24 तास पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. इतर ठिकाणीही जलवाहिन्यांसाठी खोदाईचे काम सुरू आहे. शिवाय शहरातील नऊ ठिकाणी जलकुंभ उभारले जात आहेत.
यापैकी काही जलकुंभांचे कामही पूर्णत्वाकडे आले आहे. शहरातील 58 प्रभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी विविध ठिकाणी खोदाई सुरू झाली आहे.शहराला राकसकोप आणि हिडकल जलाशयातून पाण्याचा पुरवठा केला जातो. हिडकल जलाशयातून बेळगावबरोबर संकेश्वर आणि हुक्केरी शहरालाही पाणीपुरवठा होतो. गतवर्षी उन्हाळ्यात पाणी समस्या गंभीर बनली होती. शहरात पाच-सहा दिवसाआड पाण्याचा पुरवठा झाला होता. मात्र यंदा समाधानकारक पावसाने राकसकोप आणि हिडकल जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीसमस्या निर्माण होणार नाही, असा दावाही एलअँडटीने केला आहे. शिवाय शहरात 24 तास पाण्यासाठी खोदाई करून जलवाहिन्या घालण्याचे कामही प्रगतीपथावर सुरू आहे. विशेषत: जलवाहिन्यांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रोबोटची मदत घेतली जात आहे.
रोबोट यंत्राची मदत
शहरात 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी घालण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांसाठी रोबोट यंत्राची मदत घेतली जात आहे. त्यामुळे जलवाहिन्या घालताना मदत होऊ लागली आहे. शिवाय बऱ्याचशा अडचणी दूर होऊ लागल्या आहेत.
चव्हाट गल्लीत पाच दिवसांपासून पाणीपुरवठा नाही
मागील पाच दिवसांपासून चव्हाट गल्लीमध्ये पाण्याचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे गल्लीतील रहिवाशांसमोर पाणीसमस्या निर्माण झाली आहे. रविवारी पाणी येईल, असे एलअँडटीकडून सांगण्यात आले. मात्र पाण्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे ऐन हिवाळ्यात चव्हाट गल्लीत पाण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. एलअँडटीकडून 2025 पर्यंत 24 तास पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी जलवाहिन्या घातल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे हिवाळ्यातच पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. चव्हाट गल्लीत सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.