मुत्यानट्टी गावात 24 तास पाणीपुरवठा
आमदार राजू सेठ यांच्या हस्ते शुभारंभ : ग्रामस्थांमधून समाधान
बेळगाव : मुत्यानट्टी परिसरातील नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा योजनेचा शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला. बेळगाव उत्तरचे आमदार असिफ ऊर्फ राजू सेठ, माजी आमदार फिरोज सेठ यांच्या उपस्थितीत शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला. यामुळे नागरिकांना स्वच्छ पाण्याचा 24 तास पुरवठा केला जाणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा करता यावा, यासाठी मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होता. एलअँडटी कंपनीच्या सहकार्याने मुत्यानट्टी येथे 24 तास पाण्याचा पुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली. मुत्यानट्टी ग्रामस्थांनी पाणीपुरवठा केल्याबद्दल आमदारांचे आभार मानले. उद्घाटन समारंभानंतर आमदार असिफ सेठ यांनी परिसरातील मंदिरांना भेटी देऊन विकासकामांची माहिती जाणून घेतली. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अतिरिक्त निधी दिला जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले. याबरोबरच सांस्कृतिक भवन व धार्मिक सभागृहांचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.