मुत्यानट्टी, आरसीनगर, काकती परिसरात 24 तास पाणी
प्रायोगिक तत्त्वावर पुरवठा : नवीन प्रकल्पाला यश
बेळगाव : 24 तास पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मुत्यानट्टी, काकती आणि आरसीनगरमध्ये प्रयोगिक तत्त्वावर 24 तास पाणीपुरवठ्याला प्रारंभ झाला आहे. शहरातील उर्वरित भागातही लवकरच 24 तास पाणीपुरवठा होणार आहे. यासाठी विशेष योजना राबविण्यात आली आहे, अशी माहिती एलअॅण्डटी कंपनीने दिली आहे. शहराला राकसकोप आणि हिडकल जलाशयातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मागील 35 वर्षांपासून मुत्यानट्टी येथे मनपाकडून पाण्याचा पुरवठा होत होता. आता ही जबाबदारी एलअॅण्डटी कंपनीवर देण्यात आली आहे. विशेषत: शहराच्या 9 ठिकाणी सुसज्ज जलकुंभ उभारले जातात. यापैकी 7 जलकुंभांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे 24 तास पाणीपुरवठ्याचा मार्गही मोकळा झाला आहे. मात्र सध्यस्थितीत मुत्यानट्टी, आरसीनगर आणि काकती परिसरातील काही घरांना 24 तास पाणीपुरवठा केला जात आहे.
24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी मुत्यानट्टी, आरसीनगर आणि काकती परिसरातील 176 घरांना नवीन नळ जोडणी करण्यात आली आहे. या नळांना 24 तास पाणीपुरवठा केला जात आहे. विशेषत: येत्या काही दिवसात संपूर्ण शहरालाच पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट एलअॅण्डटीने ठेवले आहे. मुत्यानट्टी, आरसीनगर आणि काकती परिसरातील काही घरांना 24 तास पाणीपुरवठा करून चाचपणी केली जात आहे. शहराला शुद्ध आणि 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष योजना राबविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जलकुंभ, जलवाहिन्या आणि इतर कामेही प्रगतीपथावर सुरू आहेत. शहरातील विविध भागांमध्ये 24 तास पाणी पुरवठ्यासाठी जलवाहिन्या घातल्या जात आहेत. काही ठिकाणी हे काम पूर्णत्वाकडे आले आहे. त्यामुळे लवकरच चाचणी घेऊन पाणीपुरवठा केला जाणार आहे.