हनुमाननगर परिसरात 24 तास पाण्यासाठी खोदाई
सुसज्ज रस्त्याची खोदाई : वाहतुकीला अडथळा
बेळगाव : शहरात 24 तास पाणीपुरवठ्यासाठी विविध ठिकाणी खोदाईचे काम सुरू झाले आहे. मात्र यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. तसेच सुसज्ज असलेल्या काँक्रिटच्या रस्त्यांचीही वाट लागू लागली आहे. एलअँडटी कंपनीकडून 2025 पर्यंत 24 तास पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरात विविध ठिकाणी जलवाहिन्या घातल्या जात आहेत. सद्यस्थितीत हनुमाननगर, कणबर्गी, मुत्यानट्टी, आर. सी. नगर, शास्त्राrनगर परिसरात 24 तास पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिन्या घातल्या जात आहेत. प्रायोगिक तत्त्वावर मुत्यानट्टी परिसरात 24 तास पाणीपुरवठा केला जात आहे.
शहरातील इतर भागातही जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर 24 तास पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. यासाठी शहरातील चौदा ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येत आहेत. यापैकी सात जलकुंभांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित जलकुंभांचे कामही येत्या उन्हाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. त्यानंतर शहराला 24 तास पाणीपुरवठा होणार आहे. हनुमाननगर सर्कलपासून विनायक मंदिरकडे येणाऱ्या रस्त्यावर खोदाई केली आहे. त्यामुळे हा मार्ग बॅरिकेड्स लावून बंद ठेवला आहे. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होऊ लागला आहे. काही ठिकाणी खोदलेली कामेही अर्धवट आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वळसा घालून जावे लागत आहे.