For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळून 24 भाविक ठार

06:50 AM Feb 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
ट्रॅक्टर ट्रॉली तलावात कोसळून 24 भाविक ठार
Advertisement

उत्तर प्रदेशात गंगास्नानासाठी जाताना दुर्घटना : अन्य 15 ते 20 जण जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळून झालेल्या दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आठ लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातात अनेक जण जखमीही झाले आहेत. माघ पौर्णिमेनिमित्त भाविक गंगास्नानासाठी नदीकडे जात असताना ट्रॅक्टर-ट्रॉली अनियंत्रित होऊन 7 ते 8 फूट खोल तलावात  उलटली.

Advertisement

उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात शनिवारी सकाळी ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होऊन तलावात पडल्याने आठ मुलांसह 24 जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पटियाली पोलीस स्टेशन हद्दीतील पटियाली-दरियावगंज रस्त्यावर ट्रॅक्टर-ट्रॉलीतील प्रवासी गंगा नदीत आंघोळीसाठी जात असताना ही दुर्घटना घडल्याचेही स्पष्ट करण्यात आले. यात 15 ते 20 जण जखमी झाल्याचे अलिगड रेंजचे महानिरीक्षक शलभ माथूर यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख ऊपये आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले. जखमींना वेळेवर योग्य ते वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

मृतांमध्ये 13 महिलांचा समावेश

या अपघातात 8 मुले आणि 13 महिलांसह 24 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. कासगंजमधील मुख्य वैद्यकीय अधिकारी राजीव अग्रवाल यांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केली आहे. सुमारे 20 जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

रस्त्यावरील कारला टक्कर टाळण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रॅक्टरचालक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना ट्रॉली पलटी झाली. सदर भाविक एटा जिह्यातील जैथारा येथून ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून गंगास्नानासाठी निघाले होते. दुर्घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांनी भाविकांची सुटका करून त्यांना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. कासगंज जिल्हाधिकारी सुधा वर्मा यांनी अपघाताची माहिती दिली.

Advertisement
Tags :

.