अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी 2,395 प्रश्न दाखल
- मुख्यमंत्री 6 मार्चला सादर करणार अर्थसंकल्प
प्रतिनिधी/ पणजी
येत्या 6 मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी एकूण 2,395 प्रश्न आले असून त्यात 563 तारांकित तर 1832 अतारांकित प्रश्नांचा समावेश आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 6 मार्च रोजी 2026-27 चा अर्थसंकल्प अर्थमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सादर करतील.
अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी सभापती गणेश गावकर यांच्या अध्यक्षतेखाली काल बुधवारी विधानसभा संकुलात बैठक झाली. त्याची माहिती प्राप्त झाली असून 9 व 10 मार्च असे दोन दिवस अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. अर्थसंकल्पावर 3 दिवस चर्चा होते. परंतु यावेळी दोनच दिवस देण्यात आले आहेत. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 27 मार्च रोजी विनियोग विधेयक सादर करण्यात येणार असून त्यास मान्यता दिली जाणार आहे.
शुक्रवारी खासगी कामकाजाचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी अर्थसंकल्प सादर करण्यास विरोधी आमदारांनी आक्षेप घेतला आणि विरोध दर्शवला, परंतु त्यास मान्यता मिळाली नाही. त्यामुळे खासगी कामकाजाचा एक दिवस कमी होणार असून विरोधी आमदारांनादेखील कमी वेळ मिळणार आहे. नंतर 11 मार्चपासून विविध सरकारी खात्यांच्या मागण्यावर चर्चा होणार असून ती 11 दिवस चालणार आहे. पुरवणी मागण्यांचे विधेयकही सादर करण्यात येणार असून 15 खासगी प्रस्तावही संबंधित खात्यांच्या मान्यतेनंतर चर्चेला घेणार असल्याचे सांगण्यात आले.