For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केनियातील हिंसाचारात 23 आंदोलकांचा मृत्यू

06:33 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
केनियातील हिंसाचारात 23 आंदोलकांचा मृत्यू
Advertisement

कर विधेयकाविरोधात हजारो लोक रस्त्यावर: संसदेला आग, भारताकडून मार्गसूची जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नैरोबी

नवीन कर विधेयकाविरोधात आफ्रिकन देश केनियामध्ये मंगळवारी हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी संसदेबाहेरील बॅरिकेड्स ओलांडून आत प्रवेश करत संसदेत धुडगूस माजवला. यादरम्यान पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. या हिंसाचारात 23 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले. या निदर्शनात बहुतांश तऊणांनी भाग घेतला होता.

Advertisement

केनियामध्ये अनेक आठवड्यांपासून कर विधेयकाविरोधात निदर्शने सुरू आहेत. या विधेयकांतर्गत राष्ट्राध्यक्ष विल्यम ऊटो यांचे सरकार देशातील कर वाढवणार आहे. याअंतर्गत देशातील शिक्षणापासून सर्व अत्यावश्यक सेवांवरील महसूल वाढवला जाण्याचा धोका असल्याने हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत.

संसदेतील हिंसाचारावेळी खासदारांना भूमिगत बोगद्यातून बाहेर काढण्यात आले. आंदोलकांनी संसदेच्या आवारातही तोडफोड केली. केनियातील भारतीय दुतावासानेही नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. भारतीयांना विनाकारण घराबाहेर पडू नये आणि हिंसाचाराच्या ठिकाणांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच दुतावासाच्या सतत संपर्कात राहण्याचा सल्लाही देण्यात आला.

केनियाची राजधानी नैरोबीमध्ये आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचाही वापर केला. केनियातील सामाजिक कार्यकर्त्या आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची सावत्र बहीण औमा ओबामा यांनीही या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला. निदर्शनादरम्यान लोकांनी केनियाला कधीच स्वातंत्र्य मिळाले नाही, अशा घोषणा दिल्या. इथे वसाहतवाद अजूनही सुरू आहे.

बहुतांश खासदारांचा कर विधेयकाला पाठिंबा

हे विधेयक मे महिन्यात मांडण्यात आले होते. संसदेत उपस्थित असलेले बहुतांश खासदार या विधेयकाच्या समर्थनार्थ आहेत. सरकारी काम पूर्ण करण्यासाठी हे आवश्यक आहे, असे त्यांचे मत आहे. या विधेयकाची अंमलबजावणी न झाल्यास सरकारी संस्थांमधील काम ठप्प होईल, असे खासदारांचे म्हणणे आहे. मंगळवारी या विधेयकावर झालेल्या मतदानादरम्यान 195 पैकी 106 खासदारांनी त्याच्या बाजूने मतदान केले.

Advertisement
Tags :

.