बलुचिस्तानात सशस्त्र गटांकडून 23 जणांची हत्या
महामार्ग बंद करत वाहने रोखली : ओळखपत्र पाहून झाडल्या गोळ्या
वृत्तसंस्था/ ग्वादार
पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे रविवारी रात्री अज्ञात बंदुकधाऱ्यांनी 23 जणांची हत्या केली आहे. बहुतांश मृत प्रवासी हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहिवासी होते. हल्लेखोरांनी या लोकांना बसमधून खाली उतरवत त्यांचे ओळखपत्र तपासले आणि त्यानंतरच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. मृतांमध्ये 20 जण पंजाब प्रांतातील तर 3 जण बलुचिस्तानचे रहिवासी होते.
हल्लेखोरांनी राराशम भागात महामार्ग बंद केला होता. यानंतर ते पंजाब प्रांतातून येणारी वाहने रोखून चौकशी करू लागले. हल्लेखोरांनी प्रवाशांची ओळखपत्रे तपासत त्यांना ठार केले आहे. तसेच यानंतर 12 वाहनांना पेटवून देत हल्लेखोरांनी तेथून पळ काढल्याची माहिती मूसाखेलचे पोलीस अधिकारी नजीब काकर यांनी दिली आहे.
अद्याप स्वीकारली नाही जबाबदारी
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही संघटनेने स्वीकारली नाही. एका प्रतिबंधित दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला असल्याचे म्हणत मूसाखेलचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अयूब खोसो यांनी त्याचे नाव उघड करणे टाळले आहे. पंजाब प्रांतातील लोकांची ओळख पटवून त्यांना ठार करण्यात आल्याचे समोर आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पंतप्रधानांकडून हल्ल्याची निंदा
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याची कठोर निंदा केली आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार दहशतवाद्यांना कठोर शिक्षा केली जाणार आहे. देशात कुठल्याही प्रकारचा दहशतवाद सहन केला जाणार नसल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनीही या हल्ल्याची निंदा केली. बलुचिस्तान सरकार या दहशतवाद्यांचा पाठलाग करणार असल्याचे बुगती म्हणाले.
एप्रिलमध्ये झाला होता हल्ला
या हल्ल्यापूर्वी एप्रिलमध्ये अशाच प्रकारचा एक हल्ला झाला होता. ज्यात लोकांची ओळख पटवून त्यांना ठार करण्यात आले होते. तेव्हा बलुचिस्तानच्या नुश्कीनजीक ओळखपत्र तपासल्यावर 9 जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. मारले गेलेले सर्व जण पंजाब प्रांताचे रहिवासी होते. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अज्ञात हल्लेखोरांनी केच जिल्ह्यातील तुरबत येथे पंजाबच्या 6 मजुरांची हत्या केली होती. अशाचप्रकारे 2015 मध्ये हल्लेखोरांनी तुर्बानजीक 20 पंजाबी मजुरांची हत्या केली होती.