उत्खननात मिळाला 2200 वर्षे जुना ‘सुपर हायवे’
पर्वतांना चिरून तयार करण्यात आला होता 900 किमी लांब रस्ता
पुरातत्वतज्ञांनी जमिनीखाली दडलेल्या इतिहासाचे एक असे पान खुले केले आहे, ज्याने आधुनिक इंजिनियरिंगलाही विचारात पाडले आहे. चीनमध्ये पुरातत्वतज्ञांनी 2200 वर्षे जुन्या एका विशाल रस्त्याच्या नव्या हिस्स्याचा शोध लावला आहे. प्राचीन जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी याला एक मानले जात आहे. या मार्गाला ‘चिन स्ट्रेट रोड’ नावाने ओळखले जाते. याची तुलना सद्यकाळातील महामार्गाशी केली जात आहे.
वाळूत दडलंय 900 किलोमीटरचे रहस्य
चीनच्या शांक्सी प्रांतातील युलिन शहरात सांस्कृतिक वारसा संरक्षण आणि संशोधन संस्थेने याचा शोध लावला आहे. पुरातत्वतज्ञांना उत्खननात या प्राचीन रस्त्याचा 13 किलोमीटर लांबीचा हिस्सा मिळाला आहे. हा रस्ता चीनच्या पहिल्या साम्राज्याच्या हार्टलँडला त्याच्या सीमांशी जोडण्यासाठी निर्माण करण्यात आला होता. ऐतिहासिक दस्तऐवजांनुसार हा पूर्ण महामार्ग सुमारे 900 किलोमीटर लांब होता, जो उत्तर चीनमधून जाणारा होता.
केवळ 5 वर्षांमध्ये निर्मिती
इतिहासाची पानं उलटल्यास चीनचा पहिला सम्राट चिन शी हुआंगने या रस्त्याच्या निर्मितीचा आदेश दिला होता असे कळते. त्या काळात कुठल्याही आधुनिक यंत्रसामग्रीशिवाय हा विशाल रस्ता केवळ 5 वर्षांमध्ये निर्माण करण्यात आला होता.
चीन टू मंगोलिया
या रस्त्याचा मुख्य उद्देश राजधानी जियानजांगला इनर मंगोलियाच्या जियुयुआनशी थेट जोडणे होता. हा एक सैन्यमार्ग होता, ज्याला विशेष रुपाने ‘जियोनग्नू’ टोळीच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी सैन्य आणि रसदला वेगाने सीमेपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार करण्यात आले होते.
4 पदरी महामार्गाइतका रुंद
उत्खननात मिळाल्या रस्त्याच्या रचनेने वैज्ञानिकांना चकित केले आहे. तया काळातही इंजिनियर्सनी पर्वतांना कापून आणि खोऱ्यांना भरून काढत एक अत्यंत सरळ रस्ता तयार केला होता. हा रस्ता सरासरी 40 मीटर रुंद होता, जो आजच्या काळातील 4 पदरी महामार्गाइतका आहे. काही ठिकाणी तर याची रुंदी 60 मीटरपर्यंत होती. रस्त्याला मजबूत करण्यासाठी ‘रॅम्ड अर्थ’ तंत्रज्ञान आणि उतारांचा वापर करण्यात आला होता.
वाळवंटात उपग्रहाद्वारे लागला सुगावा
युलिनयुक्त हिस्सा मू उस वाळवंटात दडलेला होता, जो शोधणे अत्यंत अवघड होते. पुरातत्वतज्ञांनी ऐतिहासिक नोंदीची तुलना आधुनिक उपग्रहीय छायाचित्रांशी केल्यावर वाळवंटात दाबल्या गेलेल्या या रस्त्याच्या रेषा दिसून आल्या. तेथे एक छोटा रिले स्टेशन आणि मातीच्या भांड्यांचे तुकडेही मिळाले आहेत. या रस्त्याचा वापर चिन राजवंशापासून हान राजवंशापर्यंत (ख्रिस्तपूर्व 206 ते ईसवीन सन 220) होत राहिला. चीनच्या सांस्कृतिक वारसा प्रशासनाने याला चीनच्या महान भिंतीनंतरचा दुसरा सर्वात मोठा राष्ट्रीय रक्षण प्रकल्प आणि जगातील महामार्गांचा पूर्वज संबोधिले आहे.