आसाममध्ये 2,200 कोटींची फसवणूक
मुख्यमंत्र्यांनी लोकांना केले सतर्क
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसामच्या गुवाहाटीमध्ये लोकांच्या नावाने बँक खाते उघडून फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हा घोटाळा हजारो कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा आहे. गुन्हेगारांनी लोकांचे पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ऑनलाइन शेअरबाजारात फसवणूक केली होती. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे. डिब्रूगढचा 22 वर्षीय विशाल फुकन आणि गुवाहाटीचा स्वप्नील दास हे पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. या टोळीच्या कारवाया पूर्ण राज्यात फैलावल्या असल्याचे मानले जात आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडून छापे टाकले जात आहेत.
फुकन हा स्वत:च्या आलिशान जीवनशैलीद्वारे लोकांना आकर्षित करत होता. स्वत:च्या गुंतवणुकदारांना 60 दिवसांमध्ये गुंतवणुकीवर 30 टक्के परतावा देण्याचे प्रलोभन तो द्यायचा. त्याने चार बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या. तसेच आसामी चित्रपटउद्योगात त्याने गुंतवणूक करत अनेक संपत्ती प्राप्त केल्या होत्या.
चालू वर्षाच्या प्रारंभी गुवाहाटी येथील एका रहिवाशाने तक्रार नोंदविली होती. यात एका ओळखीच्या व्यक्तीने माझे बँक खाते उघडले होते, परंतु अनेक महिने उलटल्यावरही मला चेकबुक आणि पासबुक मिळाले नव्हते असे तक्रारदाराने म्हटले होते. या प्रकरणाचा तपास करताना चार जणांना अटक करण्यात आली. यात मुख्यत्वे टोळीचे एजंट सामील होते. तर शहराच्या हाटीगाव भागातून विविध सामग्री जप्त करण्यात आली आहे. यात 44 चेकबुक, 12 बँक पासबुक, 49 एटीएम कार्ड, विदेशी चलन, सात युपीआय स्कॅनर आणि एक आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट सामील असल्याचे पोलीस आयुक्त दिगंत बराह यांनी सांगितले आहे.
सायबर गुन्हेगार टेलिफोन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत होते. तसेच यातून मिळविलेला पैसा ते विविध लोकांच्या नावावर उघडण्यात आलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करत होते.
मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी अशाप्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन लोकांना केले आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारांपासून लोकांनी दूर रहावे. पोलिसांनी आता अशा गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली आहे. आम्ही राज्यातील या रॅकेटचा पर्दाफाश करणार आहोत असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.