बनावट धनादेश दिल्याबद्दल उसतोड मजूर पुरवणाऱ्या मुकादमास 22 लाख 48 हजाराचा दंड
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्यास उसतोडणी करून मजूर पुरवणे व वाहतूक करणेबाबत करार करून तो न पाळता कारखान्यास न वटणारा धनादेश दिल्याप्रकरणी करगणीतील विजयसिंह पाटील यांना तीन महिने कारावास आणि 22 लाख 48 हजार दंडाची शिक्षा सुनावली.
आटपाडी न्यायालयाचे न्यायाधीश विनायक पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. करगणीचे माजी सरपंच विजयसिंह तात्यासो पाटील यांनी कारखान्या सोबत करार केला होता. कराराप्रमाणे त्यांनी काम केले नाही. यामुळे कारखान्याला असलेल्या देणे पोटी त्यांनी 13 लाख 43 हजार 253 इतक्या रक्कमेचा धनादेश कारखान्यास दिला. सदरचा धनादेश न वटल्यामुळे कारखान्याने आटपाडी न्यायालयात फिर्याद दाखल केलेली होती. न्यायाधिश विनायक पाटील यांनी सदर प्रकरणी विजयसिंह पाटील यांना दोषी धरून तीन महिने साधा कारावास व नुकसान भरपाई म्हणून 22 लाख 48 हजार रूपये फिर्यादीला देण्याचे आदेश दिले. तसेच ती रक्कम न भरलेस 1 महिना साधा कारावास तसेच 30 हजार रूपये दंड व तो दंड न भरल्यास 15 दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. कारखान्यामार्फत अॅड. दिलीप पाटील यांनी काम पाहिले.