जिल्ह्यातील 214 ग्रामपंचायत ‘क्षयरोगमुक्त’
रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्हयासाठी क्षयरोग निर्मूलनासाठी जि. प. आरोग्य विभागाने केलेल्या प्रभावी प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. जिह्यातील 846 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 214 ग्रामपंचायती आता ‘टीबीमुक्त ग्रामपंचायत’ म्हणून पात्र ठरल्या आहेत. लवकरच या ग्रामपंचायतींचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या ‘देश टीबीमुक्त‘ धोरणांतर्गत रत्नागिरी जिह्यात ‘क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान’ मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आले. या अभियानामध्ये ग्रामपंचायतींची निवड करताना काही महत्वाचे निकष निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार वार्षिक 1 हजार लोकसंख्येमध्ये कमीत-कमी 30 टीबी संशयित ऊग्ण शोधणे, त्यांच्या थुंकीच्या नमुन्यांची तपासणी करणे आणि 100 टक्के निक्षय पोषण योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे यांसारख्या निकषांची पूर्तता करणाऱ्या ग्रामपंचायती टीबीमुक्त म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. जिह्यातील ग्रामपंचायतींनी क्षयरोग निर्मूलनासाठी दाखवलेल्या या सक्रिय सहभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लवकरच या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात येणार आहे.