For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिलांना दर महिन्याला 2100 रुपये

07:00 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
महिलांना दर महिन्याला 2100 रुपये
Advertisement

हरियाणात भाजपकडून आश्वासन : घोषणापत्र सादर

Advertisement

वृत्तसंस्था /रोहतक

भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांनी गुरुवारी रोहतक येथे हरियाणा विधानसभा निवडणुकीकरता पक्षाचे घोषणापत्र जारी केले आहे. यादरम्यान मुख्यमंत्री नायब सैनी, केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. भाजपने राज्यातील महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. महिलांकरता राज्यात लाडो लक्ष्मी योजना राबविली जाणार आहे. भाजपने आयएमटी खरखौदाच्या धर्तीवर 10 औद्योगिक शहरांची निर्मिती करणार असल्याचे सांगत प्रति शहर 50 हजार स्थानिक युवांना रोजगार देण्यासाठी उद्योजकांना विशेष प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे.

Advertisement

तर चिरायू-आयुष्मान योजनेच्या अंतर्गत प्रत्येक परिवाराला 10 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार पुरविण्याचे आश्वासन सत्तारुढ पक्षाकडून देण्यात आले. 24 पिकांची एमएसपीवर खरेदी केली जाणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. तर 2 लाख युवांना शासकीय नोकरीत भरती करण्याची घोषणा पक्षाने केली. 5 लाख युवांसाठी रोजगाराच्या संधी तसेच नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन योजनेद्वारे मासिक  स्टायपेंड दिले जाणार आहे.

5 लाख घरे बांधून देणार

भाजपने हरियाणात शहरी तसेच ग्रामीण क्षेत्रांमध्ये 5 लाख नवी घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे. तर शासकीय रुग्णालयांमध्ये डायलिसिस तसेच सर्व रुग्णालयांमध्ये निदान मोफत करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ऑलिम्पिक  क्रीडाप्रकारांसाठी नर्सरी सुरू करण्यात येईल. राज्य सरकारच्या वतीने 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर पुरविण्यात येणार आहे. ग्रामीण क्षेत्रात महाविद्यालयात जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला स्कूटर प्रदान करण्यात येणार असल्याचा दावा भाजपने केला आहे.

अग्निवीरला शासकीय नोकरीची हमी

भाजपने हरियाणातील प्रत्येक अग्निवीरला शासकीय नोकरी प्रदान करण्याची हमी देणार असल्याची घोषणा केली आहे. तर मागास समुदायांसाठी विविध कल्याण महामंडळे स्थापन करण्यात येतील. सर्व सामाजिक पेन्शन्समध्ये वाढ करण्यात येणार आहे. दक्षिण हरियाणात आंतरराष्ट्रीय स्तराचे अरावली जंगल सफारी पार्क विकसित केले जाणार असल्याचे भाजपने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.