Palghar News पालघरमधील तरुणाने किल्ल्यानजीक स्वत:ला संपवले
| त. भा. प्रतिनिधी
मंडणगड : गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेला पालघर येथील निखिल रवींद्र पडवळकर (२१) हा २० मे रोजी किल्ले मंडणगड येथे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. तो चिखलगाव येथील माध्यमिक शाळेत लिपिक म्हणून कार्यरत होता. नोकरीनिमित्त येथे स्थिरावलेल्या निखिलच्या आत्महत्येने गावावर शोककळा पसरली आहे.
निखिल हा १७ जून पासून बेपत्ता होता. तो बुधवारी सकाळी आठ वाजता त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन घरातून नेहमीप्रमाणे बाहेर पडला होता. मात्र तो नेहमीच्या वेळी परत न आल्याने निखिलच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी त्याचा शोध घेणे सुरू केले. तो कोठेही आढळून न आल्याने तो बेपत्ता असल्याची तक्रार मंडणगड पोलीस स्थानकात करण्यात आली होती.
दरम्यान, निखिल बुधवारी नेहमीप्रमाणे आपल्या कामाकरिता शाळेत गेलेला नसल्याचे व त्याचे दोन्ही मोबाईल बंद असल्याची माहिती पुढे आली होती. नातेवाईक व ग्रामस्थ त्याचा विविध ठिकाणी शोध घेत होते. अखेर शनिवारी किल्ले मंडणगड येथे दर्ग्याच्या शेजारी असलेल्या झाडाला गळफास लावून झाडावर लटकत असलेल्या स्थितीत निखिलचे पार्थिव आढळून आले. त्याने दुचाकी जवळ उभी करून ठेवलेली आढळली.
याशिवाय शर्टच्या वरच्या खिशात लिहून ठेवलेली सुसाईड नोटही पोलिसांना सापडून आल्याची माहिती पुढे येत आहे. तो गावी राहात होता. पालक मुंबईत कामानिमित्त वास्तव्यास असून तो नोकरीत स्थिरावला असल्याने त्याच्या लग्नाची बोलणीही सुरू होती.