कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘बिम्सटेक’मध्ये 21 कलमी कृती आराखडा

06:36 AM Apr 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रादेशिक सहकार्याला चालना देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुतोवाच

Advertisement

वृत्तसंस्था/ बँकॉक

Advertisement

थायलंडची राजधानी बँकॉक येथे आयोजित सहाव्या बिम्सटेक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदस्य देशांमधील सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने 21 कलमी कृती आराखड्याचे अनावरण केले. ही योजना भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ आणि ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणांच्या अनुषंगाने आर्थिक वाढ, डिजिटल परिवर्तन, आपत्ती व्यवस्थापन, ऊर्जा सुरक्षा, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि युवा विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे.

बिम्सटेक शिखर परिषदेत शुक्रवारी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. बिम्सटेक हे प्रादेशिक प्रगतीसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ असून ते मजबूत करणे आवश्यक आहे. आर्थिक एकात्मतेला चालना देण्यासाठी बिम्सटेक चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना, वार्षिक व्यवसाय शिखर परिषद आणि सदस्य देशांमध्ये स्थानिक चलनांमध्ये व्यापार वाढवण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. तसेच सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा धोके, दहशतवाद आणि ड्रग्जसह मानवी तस्करीविरुद्धच्या लढाईत बिम्सटेक हे व्यासपीठ महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असेही पंतप्रधान म्हणाले.

डिजिटल परिवर्तनासाठी पंतप्रधान मोदींनी भारताच्या माहिती तंत्रज्ञान कौशल्याचा वापर करण्याचा सल्ला दिला. भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा अवलंब करण्याचा आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसला (युपीआय) प्रादेशिक पेमेंट सिस्टमशी जोडण्याचा प्रस्ताव दिला. आपत्ती व्यवस्थापनाला बळकटी देण्यासाठी त्यांनी भारतात बिम्सटेक आपत्ती व्यवस्थापन केंद्राची स्थापना करण्याची आणि त्यानंतर संयुक्त आपत्ती व्यवस्थापन सराव आयोजित करण्याची घोषणा केली.

सुरक्षा सहकार्य हादेखील या परिषदेतील एक महत्त्वाचा भाग होता. या विषयाला अनुसरून पंतप्रधान मोदींनी भारतात पहिली बिम्सटेक गृहमंत्र्यांची बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांनी रिमोट सेन्सिंग डेटाचा वापर करून नॅनो-सॅटेलाइट्स प्रक्षेपित करण्याचा आणि प्रादेशिक सुरक्षा सहकार्य मजबूत करण्याचा सल्ला दिला. ऊर्जा सुरक्षेला चालना देण्यासाठी तरुण व्यावसायिकांना बेंगळूरमध्ये नुकत्याच उघडलेल्या बिम्सटेक ऊर्जा केंद्रात प्रशिक्षण दिले जाईल आणि प्रादेशिक वीज ग्रिड कनेक्शन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

2027 मध्ये भारतात बिम्सटेक गेम्स

पंतप्रधान मोदींनी तरुणांच्या सहभागावर भर दिला आणि यंग लीडर्स समिट, प्रादेशिक हॅकेथॉन आणि यंग प्रोफेशनल्स व्हिजिटर प्रोग्रामचा प्रस्ताव दिला. भारत 2025 मध्ये बिम्सटेक अॅथलेटिक्स मेळावा आणि 2027 मध्ये पहिले बिम्सटेक गेम्स आयोजित करेल. याव्यतिरिक्त सांस्कृतिक आणि कनेक्टिव्हिटी उपक्रमांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी भारतात बिम्सटेक पारंपारिक संगीत महोत्सवाचे आयोजन आणि सागरी क्षेत्रातील संशोधन आणि धोरण विकासासाठी शाश्वत सागरी वाहतूक केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली.

बिम्सटेक सदस्य देशांना ‘युपीआय’शी जोडण्याचा प्रस्ताव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिम्सटेक शिखर परिषदेत ‘युपीआय’ला (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) त्यांच्या सदस्य देशांच्या पेमेंट सिस्टीमशी जोडण्याचा प्रस्ताव मांडला. पंतप्रधान मोदींच्या या पावलामुळे या प्रदेशात व्यापार, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळू शकते. बिम्सटेक परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी ‘बिम्सटेक चेंबर ऑफ कॉमर्स’ स्थापन करण्याचा आणि वार्षिक व्यवसाय शिखर परिषद आयोजित करण्याचा प्रस्तावही मांडला.

भूकंपाबद्दल शोकसंवेदना

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी 28 मार्च रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपात म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल शोक व्यक्त केला. आपत्ती तयारी, मदत आणि पुनर्वसन या क्षेत्रातील सहकार्य सुलभ करण्यासाठी मोदींनी भारतात ‘बिम्सटेक सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिझास्टर मॅनेजमेंट’ स्थापन करण्याचा प्रस्तावही मांडला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article