For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हॉटेलच्या भीषण आगीत 21 ठार

07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
हॉटेलच्या भीषण आगीत 21 ठार
Advertisement

दिल्लीत घटना : मृतांमध्ये अनेक विदेशी पर्यटकांचा समावेश

Advertisement

भीषण आगीमुळे धुराचे साम्राज्य

  • हॉटेलला आग लागल्यानंतर पळापळ, चेंगराचेंगरी आणि प्रचंड गोंधळ
  • अनेकांनी खिडक्यांमधून बाहेर मारल्या उड्या, पडून काही जणांचा मृत्यू
  • दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश, हॉटेल बांधकाम नियमबाह्या असल्याचे स्पष्ट

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीतील मालवीय नगर येथे असलेल्या एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत किमान 21 जण मृत झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये अनेक विदेशी पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली. ही आग बुधवारी सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या आसपास लागली. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक अनुमान व्यक्त करण्यात येत आहे. ‘लेमॉन ग्रीन रेस्टॉरंट’ असे या हॉटेलचे नाव असल्याची माहिती प्रथम देण्यात आली होती. तथापि, नंतर ही आग ‘फ्लरिश स्टे बी अँड बी’ या हॉटेलात लागल्याचे स्पष्ट झाले. मालवीय नगरच्या हौज रानी या दाट लोकवस्तीच्या भागात हे हॉटेल असून त्याचा बराचसा भाग या आगीत भस्मसात झाल्याचे वृत्त देण्यात आले आहे. आग लागल्यानंतर एक तासाने दिल्ली अग्निशमन दलाला या दुर्घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर आग विझविण्यासाठी पाण्याचे बंब पाठविण्यात आले. हॉटेलमध्ये अडकलेल्यांना वाचविण्यासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले. स्थानिक नागरिकांनीही अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी साहाय्य केले. 40 हून अधिक जणांचा जीव वाचविण्यात अग्निशामक दल यशस्वी ठरले.

11 हून अधिक जखमी

या घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार किमान 11 जण जखमी झालेले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढविण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांपैकी अनेकजणांचा जळून कोळसा झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यासाठी डीएनए परीक्षणाचा आधार घ्यावा लागणार आहे. दिल्ली पोलिसांनी घटना नोंद केली असून पुढचा तपास करण्यात येत आहे.

खिडक्यांमधून मारल्या उड्या

आग लागल्यानंतर त्वरित ती हॉटेलभर पसरली. त्यावेळी अनेक जणांनी वरच्या मजल्यांवरच्या खिडक्यांमधून खाली उड्या मारून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. काही जणांचे प्राण अशाप्रकारे वाचले आहेत. काही जणांनी तर ज्वाळांनी वेढलेल्या स्थितीत हॉटेलबाहेर उड्या मारल्या, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

चौकशीचा आदेश

या दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश दिल्ली प्रशासनाने दिला आहे. प्रथमदर्शनी ही दुर्घटनाच असल्याचे स्पष्ट होत आहे. तथापि, सर्व शक्यता गृहीत धरुन तपास केला जाणार आहे. या दुर्घटनेला जे उत्तरदायी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केलेले आहे.

नियमभंगामुळे दुर्घटना?

आगग्रस्त हॉटेलला केवळ सहा खोल्या बांधण्याची अनुमती दिल्ली प्रशासनाने दिली होती. तथापि, प्रत्यक्षात या हॉटेलात 24 खोल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बेकायदेशीर बांधकामामुळे हॉटेलच्या सुरक्षेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अग्निशमनाची व्यवस्थाही पुरेशा प्रमाणात नव्हती. सुरक्षा विषयक आणि बांधकाम विषयक नियम धाब्यावर बसविल्याने ही दुर्घटना घडल्याचे दिसून येते.

बालकासह मातेची उडी

आपल्या चार वर्षांच्या बालकाला घट्ट धरुन एका आईने या पेटत्या हॉटेलच्या खिडकीतून उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. माता आणि बालक जखमी झालेले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यात आलेली नाही. काही जणांना उड्या मारल्याने खाली आदळून मृत्यू झाला आहे. तर काही जणांचा मृत्यू हॉटेलमधून बाहेर पडता न आल्याने गुदमरुन आणि होरपळल्याने झालेला आहे.

प्रवेश-निर्गमनसासाठी एकच दरवाजा

या हॉटेलचे बांधकाम सदोष आणि नियमबाह्या पद्धतीने करण्यात आल्याचे प्राथमिक अन्वेषणात स्पष्ट झाले आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी केवळ एकच अरुंद दरवाजा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आतील लोकांना लवकर बाहेर पडता आले नाही. हॉटेलला इमर्जन्सी एक्झिटची व्यवस्थाही नव्हती. त्यामुळे आतील लोकांची कोंडी झाल्याचे आढळून आले आहे.

Advertisement
Tags :

.