बिहारमध्ये दिवसभरात वीज कोसळून 21 बळी
मुसळधार पावसामुळे पिकांचेही नुकसान
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये गेल्या आठवड्यापासून ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट आणि मुसळधार पावसाचा वर्षाव सुरू आहे. राज्यात गेल्या 24 तासात वीज कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक सहा मृत्यू मधुबनीमध्ये झाले आहेत. औरंगाबादमध्ये चार, पाटणा आणि रोहतासमध्ये दोन, भोजपूर, कैमूर, सारण, जेहानाबाद, गोपालगंज, सुपौल, लखीसराय आणि मधेपुरा जिह्यात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या मृत्यूंबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख ऊपयांची भरपाई रक्कम जाहीर केली आहे.
राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत वीज पडून 70 जणांचा मृत्यू झाला आहे. वीज दुर्घटनांसोबतच अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊसही कोसळत आहे. राज्यातील नद्यांना पूर आल्याने अनेक घरे पुरात बुडाली आहेत. बऱ्याच लोकांना घरे सोडून अन्यत्र आश्रय घ्यावा लागत आहे. पावसामुळे अनेक जिह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुढील अनेक दिवस राज्यात असेच वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुझफ्फरपूरसह अनेक जिह्यांमध्ये पुरामुळे शेकडो एकर पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
बिहारमध्ये पाऊस आणि वादळ सुरूच आहे. पाऊस आणि खराब हवामानामुळे लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आवश्यकतेशिवाय बाहेर जाण्याचे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानेही वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.