राज्यात तीन वर्षांत 2,079 बाळंतिणींचा मृत्यू
822 महिलांचा प्रसूती काळात मृत्यू : आरोग्य खात्याने लक्ष देण्याची गरज
बेळगाव : प्रसूतीच्या काळाच वैद्यकीय उपचाराचा उपयोग न होऊन बाळंतिणींचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढीस लागले असून याकडे आरोग्य खात्याने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. राज्यात गेल्या तीन वर्षांत 2,079 बाळंतिणीचा मृत्यू झाला असून यामध्ये 822 महिलांचा प्रसूती काळात मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आले आहे. बळ्ळारी जिल्हा ऊग्णालयात प्रसूतीसाठी झालेल्या तीन महिलांचा एका पाठोपाठ एक मृत्यू झाला असून अद्याप चार महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजून येते. सरकारने बाळ बाऴंतिणीच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी विविध योजना सुरू केल्या असूनही मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही.
गर्भाशयात रक्तहिनता (रक्ताचे प्रमाण कमी असणे) असणाऱ्या गर्भवतींची अधिक काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार केले तरी प्रसूतीकाळातील मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. राज्यात मागील तीन वर्षांत बाऴंतिणीच्या मृत्यू प्रमाणाची आकडेवारी अशी. 2021-22 मध्ये 782, 2022-23 मध्ये 699, 2023-24 सप्टेंबर अखेरपर्यंत 598 याप्रमाणे 2021-22 ते सप्टेंबर 2024 च्या अखेरपर्यंत 2,079 बाळंतिणीचा मृत्यू. तसेच प्रसूती काळात 2021-22 मध्ये 350, 2022-23 मध्ये 268 व 2024 च्या सप्टेंबर अखेरपर्यंत 204 याप्रमाणे एकूण 822 जणींचा मृत्यू झाला आहे.
तीन बाळंतिणीच्या मृत्यूप्रकरणी चौकशी
बळ्ळारी जिल्हा ऊग्णालयातील तीन बाळंतिणीच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील पथक पाठविण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांनी म्हटले आहे.