2026 : आव्हानांसाठी सज्ज राहुया!
आजपासून 2026 या इंग्रजी कॅलेंडर वर्षाला प्रारंभ होतोय. नूतन वर्षामध्ये नूतन संकल्प सोडणे, हे क्रमप्राप्त ठरते. आज संपूर्ण देशाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्यासमोर बाह्य संकटांबरोबरच अंतर्गत संकटांची वाढ होत आहे आणि कालानुरुप ही संकटे वाढण्याची चिन्हे जास्त दिसत आहेत. आपण भारतीय आहोत. भारतीय संस्कृती आणि परंपरा यावर आपण फार गंभीरपणे विचार करण्याची आज गरज आहे. जागतिकीकरणाच्या युगात आपण स्वत:ला ओळखायला विसरत आहोत. परिणामी बाह्य देशातील संस्कृतीचा आपण जास्त स्वीकार करायला लागलो. चार वर्षांपूर्वीची गोष्ट आठवा. संपूर्ण देशात आणि बहुतांश राष्ट्रांमध्ये ‘कोविड’ची साथ पसरली होती. त्यात लाखो नागरिक मरण पावले. एका फार मोठ्या संकटाशी जग तोंड देत होते, संघर्ष करीत होते आणि आपणही त्या संकटाला सामोरे गेलो होतो. अनेक विचारवंत, अनेक कलाकार, अनेक नेते, अशा दिग्गजांना आपण गमावून बसलो होतो. भीतीच्या एका अंधार छायेतून बाहेर आलो आणि काहीतरी मोठ्या सुधारणा करण्याच्या उद्देशाने पुढे आलो. भारताने अशा परिस्थितीत देखील आपली अर्थव्यवस्था सांभाळली. आज जागतिक स्तरावर भारत अर्थक्षेत्रामध्ये चौथ्या स्थानावर पोहोचलेला आहे. वर्षे येतील, वर्षे जातील परंतु आपल्याला येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज राहावेच लागेल. सरत्या वर्षामध्ये जम्मू-काश्मीरमध्ये पाक-पुरस्कृत दहशतवाद्यांनी गोळीबार करून अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. मात्र भारताने कठोर भूमिका घेतली आणि ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील असंख्य दहशतवाद्यांचा खात्मा केला. एवढेच नव्हे तर पाकिस्तानचे कधी नव्हे एवढे प्रचंड नुकसान भारताने करून ठेवले, जेणेकरून या उपर कधीही पाकिस्तान भारताकडे वक्रदृष्टीने पाहणार नाही, या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर पावले उचलली. अखेरीस पाकिस्तानला सपशेल माघार घ्यावी लागली. भारतावर दहशतवादाचे वारंवार जे संकट येत होते, ते अलीकडच्या काळात फारच कमी झाले होते. पाकिस्तान ज्या काही दहशतवादी कारवाया करते, त्याला या देशांमधील काही ठराविक मंडळी सहकार्य करीत असावी. त्याशिवाय त्यांना या देशात घुसणे शक्यच होत नाही. त्यामुळेच आपल्याला ‘घरभेदी’ हे एक मोठे आव्हानच आहे. आपला प्राचीन काळापासूनचा इतिहास पाहिला तर आपल्या देशाला सर्वाधिक फटका हा घरभेद्यांकडूनच बसला आहे. त्यामुळेच 2026 मध्ये देखील आपल्याला डोळ्यांत तेल घालून राहावे लागेल. भारताच्या सीमेवर असणाऱ्या सैनिकांना आपल्या प्राणांची बाजी नेहमीच लावावी लागते. अनेक नैसर्गिक संकटे आणि आव्हानांना तोंड देताना आपले सैनिक आपल्या देशाचे रक्षण करत असतात. त्यामुळेच आज नव्या वर्षाचा पहिला दिवस, या सैनिकांची थोडी आठवण करूया आणि या सैनिकांना देखील आपण मन:पूर्वक शुभेच्छा देऊया. 2026 वर्ष कसे जाईल, याबाबत अनेकजण वेगवेगळे भविष्य वर्तवित असतात. जे विधीलिखित आहे, ते कोणी बदलू शकत नाही. त्यामुळे जे काय होणार आहे, ते होऊन जाईलच. देशावर संकटे येऊ नयेत, ही प्रार्थना साऱ्यांनीच करायचीय. 2025 मध्ये आपण अनेक नैसर्गिक संकटांना तोंड दिले. महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड अशा अनेक राज्यांमध्ये पुराने थैमान घातले. बळीराजा उद्ध्वस्त झाला मात्र फिनिक्स पक्षाप्रमाणे तो देखील पुन्हा नव्याने प्रयत्न करून स्वत:च्या पायावर उभा राहिला. 144 कोटी जनतेचा जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला हा देश. त्यामुळे अंतर्गत अनेक संकटे, अनेक समस्या आहेत. त्यांना दैनंदिन तोंड द्यावेच लागणार आहे. ‘रात्रंदिना आम्हां युद्धाचा प्रसंग!’ यानुसार देशात जाती-धर्मामध्ये संघर्ष, धर्मा-धर्मामध्ये संघर्ष, जंगली मारामारी, महिलांवर अत्याचार, वाढते अपघात, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सेवनाचे प्रकार वाढताहेत. वैद्यकीय क्षेत्रात आपण कल्पनेच्या पलीकडे जाऊन प्रगती केलेली आहे. तरीदेखील हृदयविकार, कर्करोगसारखे रोग वाढत आहेत आणि ऐन ताऊण्यात अनेकजण आपले जीव गमावताहेत कारण आपण बिनधास्त असतो आणि देशात भेसळ करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपले कायदे एवढे कडक असून देखील हे अंतर्गत शत्रू आपल्याला संपवू पाहत आहेत. देशासमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामध्ये आपल्या जीवाशी खेळणारे आणि भेसळ करणारी मंडळी, ही महाघातक आहेत. त्यातून अनेकजण विविध रोगांना बळी पडत आहेत. 2026 या
कॅलेंडर वर्षामध्ये अशा भेसळबाज महाठकांना कायमचाच धडा शिकविण्याची ताकद केंद्रातील आणि देशातील सर्व राज्यांच्या सरकारांना लाभू दे. देशावर आणखीन एक मोठे संकट उभे राहिले आहे, ते म्हणजे वाढते प्रदूषण. आपण सर्वजण त्यास जबाबदार आहोत. प्रदुषणाने रोगराई पसरते. कोविड आपल्यासाठी शाप ठरला खरा परंतु त्या काळामध्ये देशातील अनेक उद्योग बंद होते. परिणामी देशात कमालीची स्वच्छता तसेच स्वच्छ हवा आपल्याला मिळाली. आपण या गोष्टी विसरत आहोत. जागतिक पातळीवर अनेक राष्ट्रांमध्ये प्रलय आले, अनेक राष्ट्रांमध्ये भूकंप वाढले, अनेक राष्ट्रांमध्ये त्सुनामी आल्या. चक्रीवादळांची संख्या तर वाढतच आहे. पृथ्वीचे वाढते तापमान ही एक गंभीर बाब आहे आणि आपल्याला त्याबाबत खरोखरच विचार करण्याची गरज आहे. नूतन वर्षी, नूतन संकल्प करताना धाडसी पावले उचलावी लागणार आहेत. आव्हाने अनेक आहेत. तंत्रज्ञानाचा अतिवापर हा देखील तेवढाच घातक आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे आज अनेक आश्चर्यकारक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. हे तंत्रज्ञान शाप की वरदान, यावर अद्याप कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तरीदेखील त्यातून ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, त्या स्वीकारण्याचा प्रयत्न आपण जरूर करूया. आधुनिक तंत्रज्ञान वाढले खरे परंतु नात्या-नात्यांमध्ये भिंती उभ्या राहात आहेत. माणसांचे जीवनमान बदलतेय आणि बऱ्याचवेळा माणूस पशुपेक्षा जास्त क्रूर झालेला दिसतोय. अलीकडेच बांगलादेशमध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत, त्यातून पशुदेखील परवडले एवढी क्रूरता माणसांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. हे प्रकार भयानक आहेत. आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागणारच आहे मात्र सकारात्मक दिशेने पाऊल टाकणे, तेवढेच गरजेचे आहे.