2025 : देशात 1 लाख 75 हजार इलेक्ट्रिक कार्सची विक्री
हायब्रीड कार्सचा दबदबा, टोयोटा किर्लोस्करची दमदार कामगिरी
मुंबई:
2025 सालात एकंदर 1 लाख 75 हजार 256 इतक्या इलेक्ट्रिक कार्सची विक्री झाली असल्याची माहिती आहे. कॅलेंडर वर्षातील ही विक्री जवळपास 76 टक्के वर्षाच्या आधारावर अधिक दिसून आली आहे. यामध्ये हायब्रीड कार्सची विक्री 83 टक्के इतकी लक्षणीय वाढली आहे. 2025 मध्ये 1 लाख 7 हजार 196 इतक्या हायब्रीड कार्सची विक्री झालेली दिसून आली.
टोयोटा किर्लोस्करचे वर्चस्व
हायब्रीड प्रकारामध्ये सादर केलेल्या 8 मॉडेलना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद नोंदवला होता. हायब्रीड प्रकारामध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटरने मागणीत आपला सर्वाधिक वाटा नोंदवला होता. जवळपास 80 टक्के बाजारातील वाटा कंपनीने हस्तगत केला आहे. अर्बन व्रुझर हायरायडर एसयूव्ही, इनोव्हा हायक्रॉस एमपीव्ही, कॅमरी सेडान आणि प्रीमीयम वेलफायर एमपीव्ही या वाहनांनी विक्रीमध्ये आपला ठसा उमटवला होता. या योगे 2025 मध्ये 87 हजार 241 हायब्रीड कार्सची विक्री कंपनीने केली आहे.
मारुतीची कामगिरी
मारुती सुझुकीला 18958 इतक्या हायब्रीड कार्स विकता आल्या आहेत. या मागच्या वर्षामध्ये कंपनीने 8 हजार 767 हायब्रीड कार्स विकल्या होत्या. ग्रँड विटारा, इनव्हिक्टो व व्हिक्टोरिस या तीन मॉडेल कंपनी विकते. जपानच्या होंडाच्या सिटी हायब्रीड सेडन या हायब्रीड गाड्या 997 विक्री झाल्या.