For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इजिप्तमध्ये आढळले 2 हजार वर्षे जुने तमिळ-ब्राह्मी शिलालेख

06:39 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
इजिप्तमध्ये आढळले 2 हजार वर्षे जुने तमिळ ब्राह्मी शिलालेख
Advertisement

2 हजार वर्षापूर्वी ईजिप्तमध्ये जायचे भारतीय

Advertisement

भारत आणि इजिप्तदरम्यान ऐतिहासिक काळापासून व्यापारी संबंध असल्याचे आपण इतिहासाच्या पुस्तकांमध्ये शिकले आहे. परंतु अलिकडेच झालेल्या एका शोधाने या माहितीला आणखी रंजक केले आहे. स्वीत्झर्लंड आणि फ्रान्सच्या संशोधकांनी इजिप्तच्या प्रसिद्ध ‘व्हॅली ऑफ किंग्स’मध्ये स्थित मकबऱ्यांवर 2 हजार वर्षे जुने तमिळ-ब्राह्मी शिलालेख शोधले आहेत. हा शोध प्राचीन काळात क्यापारी केवळ इजिप्तच्या बंदरांपर्यंत जात नव्हते, तर तेथील पर्यटनस्थळे आणि संस्कृतीमध्ये मोठी रुची बाळगून होते हे सिद्ध करतो.

स्वीस विद्वान इंगो स्ट्रॉच आणि फ्रेंच संशोधक शार्लोट श्मिट यांनी या शिलालेखांचा शोध लावला आणि डिकोड केले आहे. सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी एका तमिळ व्यापाऱ्याने इजिप्तच्या राजांच्या (फराओ) मकबऱ्यांना भेट दिली होती. त्याने 6 पैकी 5 मकबऱ्यांमध्ये 8 वेगवेगळ्या ठिकाणी स्वत:चे नाव ‘सिगाई कोर्रन’  कोरून लिहिले होते. तमिळ भाषेत ‘सिगाई’चा अर्थ मुकूट किंवा शिखर होतो आणि ‘कोर्रन’चा अर्थ नेता किंवा राजा असा होतो.

Advertisement

एका ठिकाणी ‘सिगाई कोर्रन-वरा कांत’ लिहिलेले आढळले, ज्याचा अर्थ ‘तो आला आणि त्याने पाहिले’ असा आहे. हा व्यापारी बहुधा ग्रीक भाषाही जाणत असावा, कारण त्याने ग्रीक शिलालेखांच्या शैलीची नक्कल करत स्वत:चे नाव तेथे कोरले होते असे संशोधकांचे मानणे आहे.

पर्यटनातही रुची

आतापर्यंत आम्हाला केवळ इजिप्तच्या किनारी बंदरांवर तमिळ व्यापारी पोहोचल्याचे पुरावे मिळाले होते. परंतु व्हॅली ऑफ किंग्स यासारख्या अंतर्गत भागांमध्ये हे शिलालेख मिळणे तमिळ व्यापारी तेथे दीर्घकाळापर्यंत थांबत होते हे दर्शविते. ते केवळ सामग्री विकणे आणि खरेदी करण्यासाठी येत नव्हते. तर तेथील वास्तुकला आणि इतिहास पाहण्यासाठी कित्येक मैल पायी चालत होते असे  युनिव्हर्सिटी ऑफ लॉजेनचे प्राध्यापक इंगो स्ट्रॉच यांनी सांगितले.

संस्कृत अन् प्राकृतचा संगम

संशोधकांनी व्हॅली ऑफ किंग्समध्ये एकूण 30 शिलालेख शोधले असून यातील 20 तमिळमध्ये आहेत. उर्वरित शिलालेख संस्कृत, प्राकृत आणि गांधारी-खरोष्ठी भाषांमध्ये आहेत. यातून त्याकाळी केवळ दक्षिण भारतच नव्हे तर गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर-पश्चिम भारताचे व्यापारी देखील रोमन काळादरम्यान इजिप्तचा प्रवास करत होते हे स्पष्ट होते. एका संस्कृत शिलालेखात पश्चिम भारताच्या ‘क्षहरात’ राजघराण्याच्या दूताचाही उल्लेख आहे, जे पहिल्या शतकादरम्यान तेथे पोहोचला होता.

द्विपक्षीय व्यापाराचा मोठा पुरावा

वरिष्ठ पुरालेखवेत्ते वाय. सुब्बारायलू आणि पुरातत्वतज्ञ व्ही. सेल्वाकुमार यांच्यानुसार हा शोध ‘टू-वे ट्रेड’चा ठोस पुरावा आहे. केवळ रोमन व्यापारी भारतात यायचे असे आतापर्यंत मानले जात होते. परंतु आता भारतीय व्यापारीही तितक्याच सक्रीयतेने रोम आणि इजिप्तच्या साम्राज्यापर्यंत पोहोचत होते हे स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Tags :

.