2000 वर्षे जुनी प्रेमपत्रं लागली हाती
हजारो वर्षांपूर्वीही लोक प्रेमपत्र लिहून स्वत:चे प्रेम व्यक्त करत होते. तेव्हा आजच्या प्रमाणे मोबाइल, टेलिफोन आणि पोस्ट नव्हते. आज आपण मेसेज लिहितो आणि एका क्लिमध्ये स्वत:च्या प्रियजनांपर्यंत पोहोचवितो. परंतु प्राचीन काळ मनाच्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे अवघड होते. तेव्हा लोक अशी भिंत, खडक किंवा वृक्ष निवडायचे, जेथे दोघांचेही येणे-जाणे असायचे. मग त्या भिंती किंवा खडकांवर स्वत:च्या भावनांना शब्दांचे रुप देऊन हा संदेश समोरचा व्यक्ती वाचेल अशी अपेक्षा केली जायची.
रोमन काळातील एक ऐतिहासिक शहर हजारो वर्षांपूर्वी एका ज्वालामुखी विस्फोटामुळे नष्ट झाले होते. तेथील एका भिंतीवर अशाच प्रकारे प्रेम संदेश म्हणजेच लव्ह लेटर्स मिळाले आहेत. अलिकडेच पुरातत्वतज्ञांनी पोम्पेईच्या एका भिंतीवर कोरण्यात आलेल्या भित्तिचित्रांचे (ग्रॅफिटी) अर्थ समजून घेण्यास यश मिळविले आहे. हे ग्रॅफिटी 2000 वर्षे जुने प्रेमपत्रं असल्याचे तज्ञांना कळले आहे. एका महिलेने स्वत:च्या प्रियकराच्या नावाने संदेश लिहिले होते. 2000 वर्षे जुन्या प्रेमपत्रांची ओळख प्रगत तंत्रज्ञानामुळेच पटू शकली आहे.
पोम्पेईच्या पुरातत्वतज्ञांनी तेथे एका भिंतीवर अलिकडेच 2000 वर्षे जुने प्रेमपत्र आणि एक ग्लॅडिएटर लढाईचे दृश्य भित्तिचित्राच्या रुपात मिळाल्याची घोषणा केली आहे.
ग्रॅफिटीच्या स्वरुपात लव्ह लेटर्स
त्या काळातील भित्तिचित्रांची शैली या शिलालेखांमध्ये दैनंदिन जीवन, क्रीडा आयोजन, प्रेमभावना आणि अपमानांशी निगडित कहाण्या सामील होत्या. त्यांना पोम्पेईच्या रंगमंच क्षेत्रापर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याशी जोडणाऱ्या मार्गिकेच्या भिंतीवर कोरण्यात आले होते. या भिंतीचे उत्खनन 230 वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी करण्यात आले होते. परंतु यावर कोरण्यात आलेले जवळपास 300 शिलालेख हे नव्या तंत्रज्ञानांनी संशोधकांना त्यांची ओळख पटविण्यास सक्षम करेपर्यंत लपून राहिले होते. या लेखांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न ‘कॉरिडॉर रुमर्स’ नावाच्या प्रकल्पाचा हिस्सा होते.
पोम्पेई ऑर्कियोलॉजिकल पार्कने हे संदेश 2022 आणि 2025 मध्ये राबविण्यात आलेल्या अभियानांदरम्यान ओळखण्यात आल्याचे आणि याचे निष्कर्ष आता समोर आल्याचे सांगितले आहे. हे भित्ति-शिलालेख पार्कमध्ये स्थित थिएटर डिस्ट्रिक्ट जाण्याच्या मार्गाला जोडणाऱ्या एका मार्गिकेच्या भिंतीवर आढळून आले आहेत.
एका शिलालेखात एराटो नावाच्या महिलेचे वर्णन आहे, यानंतर प्रेम शब्द लिहिलेला आहे. परंतु याचा विषय अद्याप स्पष्ट नाही. येथे आणखी एक संदेश लिहिलेलाअसून यात ‘मला घाई आहे, स्वत:ची काळजी घे, माझी सावा. तू माझ्यावर प्रेम करतेस हे लक्षात ठेव’ असे नमूद आहे. याचबरोबर तिसरे एक पत्र मिळाले असून ‘कोमिनियाची दासी मेथे, एटेलाची रहिवासी, स्वत:च्या मनात क्रेस्टोवर प्रेम करते, पोम्पेईची व्हिनसची आम्हा दोघांवर कृपा रहावी आणि आम्ही सदैव सदभावाने राहू शकू’ असे म्हटले गेले आहे.
230 वर्षांपूर्वी मिळाली होती भिंत
भिंतीचे उत्खनन 230 वर्षांपूर्वी करण्यात आले होते. तज्ञांना पर्यटनाने भरलेल्या या क्षेत्रामधून कुठलीही नवी माहिती किंवा कहाण्या मिळण्याची अपेक्षा नव्हती. दरवर्षी लाखो पर्यटक या भिंतीनजीकहून जात असतात. मग संशोधकांनी प्रत्येक शिलालेखाची स्थिती आणि त्यादरम्यान संबंधांची ओळख पटविण्यासाठी भिंतींचे डिजिटल मॅपिंग करविले. रिफ्लेक्टेंस ट्रान्सफॉर्मेशन इमेजिंग नावाच्या विशेष प्रकाश फोटोग्राफीचा वापर करत संशोधकांनी अनेक कोनांमधून छायाचित्रे काढली, जेणेकरून धुसर अणि घर्षण झालेल्या खुणांना रिफ्लेक्ट करता येईल. आम्ही एक अशा प्रकल्पावर काम करत आहोत, ज्याचा उद्देश पोम्पेईमध्ये फैलावलेल्या 10 हजारांहून अधिक भित्तिचित्रांचे रक्षण करणे आहे. हा एक विशाल वारसा असल्याचे उद्गार पोम्पेई पुरातत्व पार्कचे संचालक गॅब्रियल जुचट्रिगेल यांनी काढले आहेत.