2,000 च्या 97.38 टक्के नोटा आरबीआयकडे परतल्या
आता 9,330 कोटी रुपये किमतीचे चलन येणे शिल्लक
मुंबई :
तारीख 29 डिसेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या 97.38 टक्के नोटा परत आल्या आहेत. आता लोकांकडे फक्त 9,330 कोटी रुपयांच्या नोटा उरल्या आहेत, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 1 जानेवारीला सांगितले आहे.
19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याची घोषणा झाली तेव्हा 3.56 लाख कोटी रुपयांच्या या नोटा चलनात होत्या. या नोटा अजूनही कायदेशीर टेंडर राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे. 2000 च्या नोटा 2016 मध्ये नोटाबंदीनंतर चलनात आल्या. बँकांमध्ये नोटा बदलण्याची किंवा जमा करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर होती. आता फक्त आरबीआयच्या 19 इश्यू ऑफिसमध्ये नोटा बदलून किंवा जमा केल्या जात आहेत.
2018-19 पासून नोटांची छपाई थांबवली
2000 रुपयांची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये बाजारात आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या जागी 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा नवीन पॅटर्नमध्ये जारी करण्यात आल्या. मात्र, 2018-19 पासून आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली आहे. 2021-22 मध्ये 38 कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा नष्ट झाल्या.
आरबीआयने नोटा मागे घेण्याचा निर्णय का घेतला?
‘क्लीन नोट पॉलिसी’ अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. ‘क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत, लोकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी चलनी नोटांवर काहीही लिहू नये, कारण असे केल्याने त्यांचे स्वरूप खराब होते आणि त्यांचे आयुष्यही कमी होते. लोकांना व्यवहारांसाठी चांगल्या दर्जाच्या बँक नोटा (कागदी चलन) उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्लीन नोट पॉलिसी लागू करण्यात आली आहे.