20 कोटी वर्षे जुना सागरी मगरीचा जीवाश्म
लाकडाचा तुकडा समजून होता उचलला
इतिहासातील सर्वात मोठे शोध अनेकदा अजाण स्थितीतही लागत असतात असे मानले जाते. ब्रिटनच्या एका समुद्र किनाऱ्यावर एका महिला पर्यटकासोबत काहीसे असेच घडले आहे. इंग्लंडच्या सोलिहुल येथे राहणाऱ्या हीथर साल्टला समुद्रकिनाऱ्यावर एक अजब गोष्ट दिसली, ती प्रारंभी तिला लाकडाचा तुकडा असल्याचे वाटले होते. परंतु याचे सत्य समोर येताच वैज्ञानिकही दंग झाले आहेत. हे काही साधारण लाकूड नव्हे तर जगातील सर्वात जुन्या सागरी मगरींचा एक जीवाश्म होता. जो सुमारे 20 कोटी वर्षांपेक्षाही अधिक जुना आहे. हीथरसाठी हा शोध एखाद्या लॉटरीपेक्षा कमी नव्हता. कारण तिने इतिहासांच्या पानात हरवून बसलेल्या एका अत्यंत दुर्लभ शिकारीच्या रहस्याची उकल केली होती.
हीथरला ब्रिटनमधील प्रसिद्ध ‘ज्युरासिक कोस्ट’वर हा अनोखा अवशेष मिळाला आहे. हा जीवाश्म ‘चार्मोथ क्रोकोडाइल’ नावाने प्रसिद्ध ‘टर्नरसुचस हिंग्लेया’ प्रजातीचा आहे. हा अवशेष त्या जीवाच्या वरील जबड्याचा हाडाचा हिस्सा आहे. पूर्ण जगात आतापर्यंत या प्रजातीचे केवळ 11 जीवाश्मच मिळाले आहेत. ही सागरी मगर सुमारे 20 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात होती आणि आधुनिक मगरींचा पूर्वज मानण्यात येते. हा जीव सुमारे दोन मीटर लांब होता आणि याचे तोंड मासे पकडण्यासाठी सर्वात अचूक अस्त्र होते असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. हा जीव बहुतांश वेळ पाण्यातच राहायचा आणि केवळ अंडी देण्यासाठी जमिनीवर येत होता.
कसा लागला शोध
हील्थर साल्ट चार्मोथ किनाऱ्यावर लाइम रेजिस म्युझियमकडून आयोजित एका गायडेड फॉसिल वॉकमध्ये सामील झाली होती. किनाऱ्यावर अजब दिसणाऱ्या गोष्टीला पाहिल्यावर ती समुद्राच्या लाटेसोबत वाहून आलेले जुने लाकूड असावे असे तिला वाटले. परंतु बारकाईने निरीक्षण केल्यावर त्याची रचना अत्यंत वेगळी असल्याचे लक्षात आले. तिने त्वरित गाइडला याची माहिती दिली. गाइड आणि जीवाश्म वैज्ञानिक केसी रिच यांनी त्याला पाहिल्यावर ते स्वत:चा आनंद रोखू शकले नाहीत. एक फील्ड पॅलियोन्टोलॉजिस्ट म्हणून याच क्षणासाठी आम्ही जगत असतो. लोकांना मूलभूत गोष्टी शिकवून आम्ही त्यांना स्वत: शोध घेण्याची संधी देतो. कधीकधी ते विज्ञानासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी शोधत असतात असे केसी रिच यांनी सांगितले.
हा जीवाश्म ऐतिहासिक स्वरुपात महत्त्वपूर्ण असण्यासोबत त्या काळातील सागरी परिसंस्थेविषयी नवी माहिती देणारा आहे, त्या काळात डायनासोरांचे युग सुरू झाले होते. टर्नरसुचस हिंग्लेया प्रजातीचे अवशेष अत्यंत कमी मिळतात, याचमुळे जबड्याचा हा तुकडा संशोधकांसाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. आता हा जीवाश्म लाइम रेजिस म्युझियममध्ये प्रदर्शित करण्यात आला असून तेथे याला पाहण्यासाठी जगभरातून लोक पोहोचत आहेत.