हरित हायड्रोजन क्षेत्रात २०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार
भारतामध्ये 2023 पर्यंत ही गुंतवणूक अपेक्षित : दरवर्षी 5 दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन
वृत्तसंस्था/मुंबई
भारताची औद्योगिक स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हरित हायड्रोजन एक धोरणात्मक प्राधान्य म्हणून उदयास येत आहे. याचा पोलाद, खते, रिफायनिंग आणि रसायने यांसारख्या क्षेत्रांवर व्यापक परिणाम होऊ शकतो. गुंतवणुकीच्याबाबतीत भारताचे हरित हायड्रोजन क्षेत्र हे सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे.
केअरएज रेटिंग्सच्या ताज्या अहवालानुसार, भारताचे हरित हायड्रोजन क्षेत्र 2030 पर्यंत 180 अब्ज ते 200 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करू शकते. रेटिंग्स लिमिटेडच्या अहवालानुसार, हरित हायड्रोजनकडे होणारा बदल आता केवळ हवामान बदलाच्या वचनबद्धतेपुरता मर्यादित राहिलेला नाही. याचा संबंध निर्यात स्पर्धात्मकता, ऊर्जा सुरक्षा आणि कमी-कार्बन औद्योगिक उत्पादनांचा एक स्पर्धात्मक उत्पादक म्हणून भारताच्या क्षमतेशी देखील आहे. युरोपियन युनियनच्या कार्बन बॉर्डर अॅडजस्टमेंट मेकॅनिझमने या प्रकरणाचे गांभीर्य वाढवले आहे.
याअंतर्गत, जास्त कार्बन उत्सर्जन असलेल्या उत्पादनांच्या आयातीवर कार्बन-संबंधित शुल्क आकारले जाते. अहवालानुसार, भारतीय पोलाद निर्यातदारांना युरोपियन युनियनमध्ये पाठवल्या जाणाऱ्या उत्पादनांवर प्रति मेट्रिक टन 70 ते 190 डॉलर इतका अतिरिक्त खर्च येऊ शकतो. जिथे उत्सर्जनाची पूर्वनिर्धारित मूल्ये लागू केली जातात, तिथे हा खर्च प्रति मेट्रिक टन 270 डॉलरपेक्षा जास्त असू शकतो. या अंदाजांवरून असे सूचित होते की, वाढते कार्बन उत्सर्जन भारतीय निर्यातदारांसाठी एक आर्थिक आव्हान निर्माण करू शकते.
केअरएज ईएसजीचे मुख्य रेटिंग अधिकारी, निकुंज दुबे म्हणाले, ‘भारताच्या ग्रीन हायड्रोजनच्या महत्त्वाकांक्षांचे व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य प्रकल्पांमध्ये रूपांतर होणे आवश्यक आहे. यासाठी विश्वसनीय खरेदी करार, स्पर्धात्मक उत्पादन खर्च आणि मजबूत पायाभूत सुविधांची आवश्यकता असेल. योजनांची प्रभावी अंमलबजावणी ग्रीन हायड्रोजनचा स्वीकार किती वेगाने होईल हे ठरवेल.’
सर्वात मोठे आव्हान म्हणजे हरित हायड्रोजनची किंमत
सध्या, हरित हायड्रोजनची किंमत सुमारे 350 ते 450 रुपये प्रति किलो आहे, तर पारंपरिक ग्रे हायड्रोजनची किंमत सुमारे 160 ते 200 रुपये प्रति किलो आहे. जसजशी नवीकरणीय ऊर्जा स्वस्त होईल, इलेक्ट्रोलायझर्सची किंमत कमी होईल आणि प्रकल्पांचा विस्तार होण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
