सहा जणांना 20 वर्षांची कठीण शिक्षा
विशेष पोक्सो न्यायालयाचा निकाल : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार प्रकरणी ठोठावली शिक्षा
बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तसेच तिच्या कुटुंबीयाकडे तीन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या आरोपींना 20 वर्षांची कठीण शिक्षा आणि प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड पोक्सो न्यायालयाने सुनावला आहे. सचिन बाबासाहेब रायमाने, रुपा बाबासाहेब रायमाने, राकेश बाबासाहेब रायमाने (सर्व रा. नसलापूर, ता. रायबाग), रोहिणी श्रीमंत दीक्षित (रा. गळतगा, ता. चिकोडी), विनोद सुरेश माने, विजय तानाजी साळुंखे (दोघेही रा. कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी, मुख्य आरोपी सचिन बाबासाहेब रायमाने याने अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. तिला कॉलेजमध्ये जाऊन भेटणे, विविध आमिषे दाखविणे असे प्रकार सुरू केले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिचे 21 जून 2015 रोजी इतर आरोपींची मदत घेत अपहरण केले. त्या मुलीचे अपहरण केल्यानंतर निगदीवाडी (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथे आपल्या ओळखीच्या नातेवाईकांकडे ठेवले. यावेळी नातेवाईकांना आम्ही कामासाठी या ठिकाणी आलो आहोत, असे सांगितले.
अल्पवयीन मुलीच्या अपहरणानंतर तिच्यावर सचिन याने लैंगिक अत्याचार केले. काही दिवसानंतर आरोपी विनोद सुरेश माने आणि विजय तानाजी साळुंखे हे त्या मुलीच्या घरी गेले. त्यांनी तुमच्या मुलीला तुमच्याकडे आणून सोडतो, मात्र आम्हाला 3 लाख रुपये द्या अशी मागणी केली. या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी चिकोडी पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दिली. चिकोडी पोलीस स्थानकाचे तात्कालिन पोलीस निरीक्षक एम. एस. नायकर यांनी या सर्व आरोपींवर भादंवि 363, 343, 376 आणि 120 बी, 504, 384, सहकलम 149, पोक्सो अॅक्ट 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल केला. येथील विशेष पोक्सो न्यायालयामध्ये दोषारोप दाखल करण्यात आले. त्याठिकाणी 25 साक्षी तसेच कागदपत्रे पुरावे आणि मुद्देमाल तपासण्यात आले. त्यामध्ये हे सर्व जण दोषी आढळले. न्यायाधीशा सी. एम. पुष्पलता यांनी या सर्व सहा आरोपींना 20 वर्षाची कठीण शिक्षा, प्रत्येकी 10 हजार रुपये दंड ठोठावला आहे. या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.
शिक्षा होताच आरोपींचा टाहो
या खटल्यामध्ये आपणाला शिक्षा होणार नाही असा विश्वास आरोपींना होता. मात्र या प्रकरणामध्ये न्यायालयाने दोषी ठरविले. त्यानंतर सायंकाळी या सर्वांना 20 वर्षांचा कठीण कारावास अशी शिक्षा सुनावताच आरोपींनी टाहो फोडला. यावेळी या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.