20 हजार भारतीयांची होणार मायदेशात रवानगी
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून उचलले जाणार पाऊल : वैध कागदपत्रांशिवाय अमेरिकेत वास्तव्य
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येताच अवैध स्थलांतरितांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. यामुळे अमेरिकेत वैध दस्तऐवजांशिवाय राहत असलेल्या स्थलांतरितांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या लोकांनी आता कायदेशीर पर्याय अवलंबिण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे या घडामोडींमुळे भारताही चिंता आहे.
अमेरिकेच्या प्रशासनाकडून तयार दस्तऐवजांनुसार तेथे राहत असलेल्या सुमारे 18 हजार भारतीयांकडे पुरेसे वैध दस्तऐवज नाहीत. ट्रम्प प्रशासन अशा भारतीयांना त्यांच्या मायदेशी परत पाठविण्याच्या तयारीत आहे. युएस इमिग्रेशन अँड कस्टम इन्फोर्समेंटच्या (आयसीई) आकडेवारीनुसार 2024 पर्यंत 20407 लोकांकडे अमेरिकेतील वैध दस्तऐवज नव्हते किंवा अपूर्ण दस्तऐवज होते. या भारतीयांवरच ट्रम्प प्रशासनाची करडी नजर आहे. या भारतीयांसंबंधी फायनल रिमूव्हल ऑर्डर कुठल्याही क्षणी येऊ शकते. यातील 2467 भारतीय तर युएस इमिग्रेशनच्या डिटेंशन कॅम्पमध्ये आहेत. तर 17,940 भारतीयांना अमेरिकेत पेपरलेस ठरविण्यात आले आहे. अमेरिकेच्या डिटेंशन कॅम्पमध्ये राहणारे भारताचे लोक राष्ट्रीयत्वाच्या आधारावर चौथ्या क्रमांकावर आहेत.
अमेरिकेत दस्तऐवजांशिवाय स्थलांतर करणारा भारतीय हा तिसरा सर्वात मोठा समुदाय आहे. याप्रकरणी पहिल्या क्रमांकावर अमेरिकेचे शेजारी मेक्सिकन आणि दुसऱ्या क्रमांकावर साल्वाडोरचे नागरिक आहेत. अमेरिकेने 2024 मध्ये 2 लाख 70 हजार स्थलांतरितांना 192 देशांमध्ये डिपोर्ट केले आहे. यात भारतीयही सामील आहेत. 2024 मध्ये अमेरिकेने 1529 अवैध स्थलांतरित भारतीयांना मायदेशी परत पाठविले आहे.
आयसीईच्या वार्षिक अहवालानुसार चार वर्षांमध्ये डिपोर्ट करण्यात येणाऱ्या भारतीयांची संख्या 5 पट वाढली आहे. अमेरिकेने 2021 मध्ये 292 भारतीयांना डिपोर्ट केले होते. तर 2024 मध्ये ही संख्या 1529 वर पोहोचली.
फायनल रिमूव्हल ऑर्डर
रिमूव्हर ऑर्डर इमिग्रेशन न्यायाधीशाकडून जारी केला जातो. स्थलांतरिताच्या अर्जावर सुनावणी करणारा अपीलीय प्राधिकाऱ्याने या आदेशाची पुष्टी केल्यावर मग हा फायनल रिमूव्हल ऑर्डर ठरतो. अमेरिकेत सद्यकाळात 20407 भारतीय स्थलांतरित वैध दस्तऐवजांशिवाय तेथे राहत आहेत. अमेरिकेने या भारतीयांना डिपोर्टेशन लिस्टमध्ये सामील केले आहे. म्हणजेच या लोकांना त्यांच्या मूळ देशांमध्ये परत पाठविले जाणार आहे. ट्रम्प प्रशासन स्वत:च्या धोरणांवर ठाम राहिल्यास या भारतीयांचा फायनल रिमूव्हल ऑर्डर कुठल्याही क्षणी येऊ शकतो.
अमेरिकेतील अवैध स्थलांतरित
अमेरिकेत 1 कोटी 10 लाख ते 1 कोटी 40 लाखापर्यंत अवैध स्थलांतरित असू शकतात. परंतु ट्रम्प यांचे ही संख्या 2 ते 2.5 कोटी असावी असे मानणे आहे. अमेरिकेची एकूण लोकसंख्या 34 कोटी आहे. ट्रम्प प्रशासनाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 6 लाख 55 हजार व्यक्तींच्या डिपोर्टेशनला प्राथमिकता दिली आहे. याचबरोबर 14 लाख व्यक्तींना यापूर्वीच रिमूव्हल ऑर्डर मिळाला आहे.
भारतीयांचे अवैध स्थलांतर
प्यू रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत भारतातून जवळपास 7 लाख 25 हजार अवैध स्थलांतरित पोहोचले आहेत. यामुळे मेक्सिको आणि अल साल्वाडोरनंतर अनधिकृत स्थलांतरितांची तिसरी सर्वात मोठी संख्या भारतीयांची ठरली आहे.
ट्रम्प कोणते पाऊल उचलणार?
जो बिडेन, बराक ओबामा आणि जॉर्ज बुश यांची धोरण स्थलांतरितांविषयी नरमाईची होती. परंतु ट्रम्प यात मोठा बदल करणार आहेत. अवैध घुसखोरी कायमस्वरुपी रोखू. आमच्या सीमांमध्ये कुणीच घुसू शकणार नाही. आम्ही आमच्या सीमेवर कब्जा होऊ देणार नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या सीमा अधिकाऱ्यांनी वन एंट्री प्रोग्रामवर बंदी घातली आहे. याच्या माध्यमातून स्थलांतरित एक अॅप सुविधेच्या आधारावर अमेरिकेत प्रवेश करू शकत होते. याचबरोबर वन एंट्री अंतर्गत होणाऱ्या स्थलांतरितांच्या मुलाखतीही रद्द करण्यात आल्या आहेत.