For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रीय लोकअदालतीत 20 हजार खटले निकालात

12:42 PM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रीय लोकअदालतीत 20 हजार  खटले  निकालात
Advertisement

62 कोटी 8 लाख 93 हजारांची देव-घेव

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय लोकअदालत तीन महिन्यांतून एकदा भरविली जाते. शनिवार दि. 13 रोजी भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 20 हजार 143 खटले निकालात काढण्यात आले. याचबरोबर 62 कोटी 8 लाख 93 हजार 340 रुपयांची देवघेवदेखील झाली आहे. जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद या लोकअदालतीला मिळाला आहे.

Advertisement

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 583 चेक बाऊन्स, मोटार अपघात 290, वाटणी दिवाणी दावे 576, बँक व सोसायटीबाबत 221, यासह इतर खटले निकालात काढण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले खटले निकालात काढण्यासाठी लोकअदालतीमध्ये प्रयत्न करण्यात आले. त्याला बऱ्यापैकी यश आले आहे. पक्षकार व वकिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरली मनोहर रेड्डी यांनी सांगितले.

या लोकअदालतीमध्ये 2015 मध्ये दाखल करण्यात आलेले खटले निकालात काढण्यात आले. सौंदत्ती व इतर तालुक्यातील जवळपास 6 हून अधिक खटले निकालात काढण्यात आले असून, पक्षकारांनी सहकार्य केल्याचे सांगण्यात आले.

16 दाम्पत्यांची पुन्हा जुळली मने

बेळगाव जिल्हा कौटुंबिक न्यायालयात 7 तर तालुका न्यायालयात 9 जणांची काढली समजूत

किरकोळ कारणातून पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होतो. त्यातून घटस्फोटापर्यंत ते दोघेही जातात. मात्र यामुळे दोन कुटुंबांचे नातेसंबंध तुटून जातात. किरकोळ कारणातून अशा घटना घडत असतात. अशा दाम्पत्यांना न्यायाधीश मार्गदर्शन करून त्यांच्यातील गैरसमज दूर करत आहेत. त्यामुळे अनेकजण नव्याने पुन्हा संसाराला लागत आहेत. शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हा कौटुंबिक न्यायालयात 7 तर तालुक्यातील न्यायालयांमध्ये 9 जणांना नव्याने संसाराला लावण्यात आले आहे.

मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश त्यागराज यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत भरविण्यात आली. या लोकअदालतीमध्ये तातडीने खटले निकालात काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याला बऱ्यापैकी यश आले. महत्त्वाचे म्हणजे घटस्फोट, तसेच पोटगीसाठी दाखल करण्यात आलेल्या खटल्यांमधील पती-पत्नीला मार्गदर्शन करण्यात आले. त्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना नव्याने संसाराला लावण्यात आले आहे. घटस्फोट देता येतो? तसेच पोटगीही मिळू शकते. मात्र दोन कुटुंबे आणि पती-पत्नीमधील दुरावा दूर होत नाही. त्यामुळे दोन्ही कुटुंबे मानसिक तणावाखाली संपूर्ण आयुष्य काढत असतात.

न्यायालयाच्या फेऱ्या मारणे, एकमेकांविरोधात हेवेदावे मांडणे, याचबरोबर वाद घालणे, यामुळे मानसिक तणावाशिवाय काहीच निष्पन्न होत नाही. पैसा म्हणजे सर्वस्व नाही. तर आपले कुटुंबदेखील तितकेच महत्त्वाचे असते. याबाबत या दाम्पत्यांना मार्गदर्शन करून त्यांचे मनपरिवर्तन करण्यात आले. त्याला अनेकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. किरकोळ कारणातून गैरसमज निर्माण होऊन अशा घटना घडल्या होत्या. त्या दोघांनाही समजून सांगण्यात आल्यानंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निश्चय केला.

लोकअदालतीमध्ये एकूण 16 जणांना नव्याने संसाराला लावण्यात आले आहे. जास्तीतजास्त अशा प्रकारे नव्याने संसाराला लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हा न्यायाधीश त्यागराज यांनी यावेळी सांगितले. जिल्हा कायदा सेवा प्रधिकारचे सचिव मुरली मनोहर रेड्डी यांनी लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. त्याला यशही आले. जिल्हा न्यायालयातील व जेएनएफसी न्यायालयातील सर्व न्यायाधीशांनी सहकार्य केले. महत्त्वाचे म्हणजे कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीशांनी जास्तीत जास्त जणांना जोडण्याचे काम केले आहे.

Advertisement
Tags :

.