सावगावात साकारल्या गडकिल्ल्यांच्या 20 प्रतिकृती
तालुक्याच्या विविध गावांमध्ये दिवाळीनिमित्त बालचमूंनी तयार केलेल्या प्रतिकृती पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या विविध गावांमध्ये दिवाळीनिमित्त बालचमूंनी गडकिल्ल्यांच्या चित्ताकर्षक प्रतिकृती साकारल्या आहेत. पश्चिम भागातील सावगाव येथे बालचमूंनी 20 गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. ते पाहण्यासाठी ग्रामस्थांची रोज सायंकाळी गर्दी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्ज्वल्य इतिहास बालकांना समजण्यासाठी गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती महत्त्वाच्या ठरतात. अलिकडे गावागावांमध्ये गड किल्ले बनविण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवाळी सणाच्या पंधरा दिवस आधी बालचमूंनी विविध प्रकारचे साहित्य जमा करून, किल्ले बनविले आहेत. यासाठी माती, सिमेंट, विटा, कलर, कागद आदी साहित्यांपासून किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती बनविल्या आहेत.
मोबाईल-इंटरनेटद्वारे माहिती
मोबाईल व इंटरनेटच्या साहाय्याने किल्ले बघून बनविण्यात आले आहेत. यासाठी गावागावातून या बालकांना प्रोत्साहन मिळत आहे. गड किल्ल्यांचे प्रवेशद्वार, तोफखाना, गडावरील मंदिरे, विहिरी, तलाव, बाजारपेठा दाखविण्यात आल्या आहेत. तसेच किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसह मावळ्यांच्या मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या कालावधीत बहुतांशी गावांमध्ये किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतीचा उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात झाला. सावगावमध्ये सिंधुदुर्ग, रायगड, पारगड, राजहंसगड, विशालगड, लोहगड, मल्हार गड, संतोष गड, सिंहगड, पन्हाळा गड आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा सावगाव यांच्यावतीने गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी गावातील सर्व किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे परीक्षण करण्यात आले आहे. गावात भव्य शिवकालीन किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी परीक्षण केले. यावेळी सदर बालकांना संबंधित किल्ल्यांबद्दल माहिती विचारण्यात आली.
10 ते 12 दिवसात बक्षीस वितरण
छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार व विचार तरुणांनी व बालचमूंनी आत्मसात करण्याची गरज आहे, असे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. तसेच किल्ल्यांची पाहणी करण्यात आली आहे. येत्या 10 ते 12 दिवसात या किल्ल्यांच्या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.