गुजरात अग्नितांडवात 20 जणांची सुटका
भावनगरमध्ये रुग्णालयांच्या कॉम्प्लेक्सला आग
वृत्तसंस्था/ भावनगर
गुजरातमधील भावनगरमधील एका कॉम्प्लेक्समध्ये बुधवारी सकाळी आग लागली. तळघरात लागलेली आग काही वेळातच संपूर्ण इमारतीत पसरल्यामुळे चार रुग्णालये आणि अनेक दुकाने आगीच्या विळख्यात सापडली. आग पसरताच पहिल्या मजल्यावरील हॉस्पिटलची खिडकी फोडून नवजात बालकांना वाचवण्यात आले. दुसऱ्या हॉस्पिटलमधूनही रुग्णांना यशस्वीपणे बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या मदतीने जवळपास 20 जणांचा सुखरुपपणे बचाव करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. इमारतीतून धुराचे लोट पसरल्याने रुग्णांना स्थलांतरित करण्यात आले. आगीच्या कारणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीनंतर जवळपास चार रुग्णालयांमधून 20 जणांना वाचवण्यात आल्याचे अग्निशमन अधिकारी प्रद्युम्न सिंह यांनी सांगितले. या मदतकार्यात अग्निशमन दलाचे 50 हून अधिक जवान सहभागी झाले होते. इमारतीतील रुग्णालयातून नवजात बालकांनाही वाचवण्यात आले. तळमजल्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे आग लागली आणि आगीचा धूर रुग्णालयांपर्यंत पोहोचला, असे मनपा आयुक्तांनी सांगितले. आगीच्या कारणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.