सलग तिसऱ्या महिन्यात 20 लाख कोटींचा यूपीआय व्यवहार
नवी दिल्ली :
यूपीआय प्रणालीच्या माध्यमातून देशामध्ये देवाणघेवाणीच्या व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात जुलैमध्ये मूल्यानुसार पाहता 20 लाख कोटी रुपयांचे यूपीआय व्यवहार झाल्याचे पाहायला मिळाले. वर्षाच्या आधारावर पाहता यामध्ये 45 टक्के वाढ झालेली आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. यूपीआय माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवहारांमध्ये 45 टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. याचप्रमाणे व्यवहारांच्या मूल्याच्या बाबतीत पाहता 35टक्के वृद्धी पाहायला मिळाली आहे.
मे, जूननंतर जुलैतही दमदार कामगिरी
एकंदर 20 लाख 64 हजार कोटी रुपयांचा यूपीआय व्यवहार तिसऱ्या महिन्यात दिसून आला. जूनमध्ये यूपीआय व्यवहार मूल्य 20.07 लाख कोटी रुपये होते तर या आधीच्या म्हणजे मे महिन्यात 20.44 लाख कोटी रुपये मूल्याचे यूपीआय व्यवहार झाले होते. जुलै 2024 मध्ये यूपीआय व्यवहारांची माहिती घेता दर दिवसाला सरासरी 44.6 कोटी इतके देवाणघेवाणीचे व्यवहार झाल्याचे पाहायला मिळाले. यांची मूल्यांमध्ये किंमत पाहता 66,590 कोटी रुपये होते. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये यूपीआय व्यवहारांमध्ये 3.95 टक्के वाढ झाली होती.
चार महिन्यात दहापट वाढ
चालू आर्थिक वर्ष म्हणजेच 2024-25 च्या पहिल्या चार महिन्यांमध्ये यूपीआयच्या माध्यमातून 55.66 अब्ज देवाणघेवाणीचे व्यवहार झाले असून याकरता 80.19 ट्रिलियन रुपये वापरले गेले. गेल्या चार वर्षाच्या तुलनेमध्ये पाहता यूपीआय माध्यमातून होणाऱ्या देवाणघेवाणीमध्ये दहापट वाढ झालेली आहे. 2019-20 मध्ये 12.5 अब्ज इतके व्यवहार युपीआयवर होत होते जे 2023-24 मध्ये 131 अब्ज झाले आहेत. डिजिटल माध्यमातून केलेल्या एकंदर व्यवहारांमध्ये हे प्रमाण 80 टक्के इतके दिसले आहे.
कोणते कार्ड व्यवहारात अग्रेसर
गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून व्यवहारात दुप्पट वाढ झाली आहे. मात्र डेबिट कार्डच्या माध्यमातून व्यवहाराचे प्रमाण 43 टक्के घसरलेले आहे. जास्तीत जास्त नागरिक डिजिटल माध्यमातून पैशाचे व्यवहार करण्यासाठी पुढे येत आहेत, हेच वाढत्या युपीआयच्या व्यवहारांवरुन सद्यस्थितीला तरी दिसते आहे.