अक्षय ऊर्जा उत्पादनात 20 टक्क्यांची वाढ
सौर आणि पवन ऊर्जेने विक्रमाची नोंद : सीइइडब्लू-सीएफजीच्या वार्षिक अहवालातून माहिती
वृत्तसंस्था,नवी दिल्ली
भारतात अक्षय ऊर्जा उत्पादन वेगाने वाढत आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची नवीकरणीय ऊर्जा निर्मिती 20 टक्क्यांनी वाढली आहे, तर निर्मिती क्षमता जवळपास 85 टक्क्यांनी वाढली आहे. नवीकरणीय ऊर्जा उत्पादनातील वाढीच्या तुलनेत, कोळसा आणि लिग्नाइट आधारित वीज निर्मिती गेल्या वर्षीच्या तुलनेत 4.3 टक्क्यांनी घटली आहे. ही माहिती कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटरच्या ग्रीन फायनान्स सेंटरच्या (सीइइडब्लू-जीएफसी) ‘मार्केट हँडबुक‘च्या नवीन वार्षिक आवृत्तीत देण्यात आली आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 मधील नवीकरणीय ऊर्जा उत्पादन अक्षय ऊर्जा उत्पादनात मोठी वाढ दिसून येत आहे. सीइइडब्लू-जीएफसी हँडबुकनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 280721.3 दशलक्ष युनिट्स नवीकरणीय ऊर्जा निर्माण झाली, तर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये हा आकडा 232227.1 दशलक्ष युनिट्स होता. अशाप्रकारे 2025-26 या आर्थिक वर्षात नवीकरणीय ऊर्जा निर्मिती सुमारे 20 टक्क्यांनी वाढली आहे.
ााrईईडब्ल्यू-जीएफसी हँडबुकनुसार, भारताने 2025-26 या आर्थिक वर्षात विक्रमी 57.5 गिगावॅट निव्वळ वीज निर्मिती क्षमतेची भर घातली आहे, जी 2024-25 या आर्थिक वर्षातील 33.2 गिगावॅटच्या वाढीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. या नवीन वीज निर्मिती क्षमतेपैकी सुमारे 54.6 गिगावॅट (सुमारे 95 टक्के) क्षमता नवीकरणीय ऊर्जेतून (मोठ्या जलविद्युत प्रकल्पांसह) आहे, जी 2024-25 मध्ये जोडलेल्या 29.52 गिगावॅट निर्मिती क्षमतेपेक्षा सुमारे 85 टक्के जास्त आहे. नवीकरणीय ऊर्जेमध्ये सौर ऊर्जा (ग्रीड-स्केल आणि रूफटॉप) 44.6 गिगावॅट क्षमतेसह आघाडीवर आहे. यानंतर पवन ऊर्जेमध्ये 6.1 गिगावॅटची वाढ झाली आहे. भारताची एकूण स्थापित वीज क्षमता आता सुमारे 533 गिगावॅटवर पोहोचली आहे, ज्यामध्ये नवीकरणीय ऊर्जेचा (मोठ्या जलविद्युत प्रकल्पांसह) वाटा सुमारे 52 टक्के आहे.
नूतनीकरणीय ऊर्जेचे प्रमुख प्रकल्प बांधकामाधीन
सीईईडब्ल्यू-जीएफसी हँडबुकनुसार, मार्च 2026 पर्यंत भारतात सुमारे 151 गिगावॅट क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प (मोठ्या जलविद्युत प्रकल्पांसह, परंतु छतावरील सौरऊर्जा वगळून) बांधकामाधीन आहेत. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, हायब्रीड आणि मोठे जलविद्युत प्रकल्प अनुक्रमे 90 गिगावॅट, 29 गिगावॅट, 19 गिगावॅट आणि 13 गिगावॅट क्षमतेची भर घालतील अशी अपेक्षा आहे.