For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बायपासला विरोध करणाऱ्या 20 शेतकऱ्यांना अटक

10:56 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
बायपासला विरोध करणाऱ्या 20 शेतकऱ्यांना अटक
Advertisement

मच्छे येथे हलगा-मच्छे बायपासला जोरदार विरोध : उभ्या पिकांमध्ये फिरवला जेसीबी

Advertisement

बेळगाव : मच्छे येथे हलगा-मच्छे बायपास रस्त्याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे 20 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. लोकशाहीमार्गाने आंदोलन करत असताना शेतकऱ्यांना अटक करणे योग्य आहे का? असा प्रश्नदेखील आता उपस्थित होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी विरोध केला. मात्र, पोलीसबळाचा वापर करत रस्त्याचे काम सुरूच ठेवले. मच्छे गावाजवळ बुधवारी रस्त्याचे काम सुरू असताना शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी काम थांबविण्याचा प्रयत्न केला. यामुळे शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. उभ्या पिकांमध्ये जेसीबी घालण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे. आंदोलन करणारे शेतकरी अनिल अनगोळकर, राजू मरवे, गोपाळ सोमनाचे, परशराम सनदी, भैरू कंग्राळकर, हणमंत बाळेपुंद्री, महेश चतुर, सुरेखा बाळेकुंद्री, गुंडू भागाण्णाचे यांच्यासह इतर शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्या शेतकऱ्यांना पोलीस स्थानकात नेऊन स्थानबद्ध करण्यात आले होते. यावेळी त्यांना जेवण-नाश्ता देण्याची सोय करण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांनी ती नाकारली. आम्हाला मरण आले तरी चालेल, तुम्ही काय करायचे ते करा, असा इशारा  शेतकऱ्यांनी पोलिसांना दिला. या प्रकारामुळे इतर शेतकरी संघटनांतून तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे. त्याविरोधात लवकरच आंदोलन करण्याच्या तयारीत शेतकरी संघटना आहेत.

हलगा-मच्छे बायपासविरोधात लवकरच लोटांगण आंदोलन : पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांची माहिती

Advertisement

उच्च न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवत हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्याविरोधात लवकरच धर्मवीर संभाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यावेळी सरकारविरोधात तीव्र आक्रोश नोंदविण्यात आला आहे. हलगा-मच्छे बायपास रस्ता सुपीक जमिनीतून होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पूर्वीपासूनच विरोध केला आहे. न्यायालयानेही या कामाला स्थगिती दिली असताना दडपशाही करत हा रस्ता केला जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. न्यायालयाचा हा अवमान आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयीन लढाई लढणारच, मात्र आता रस्त्यावरील लढाईही लढणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सरकार आम्हाला नुकसानभरपाई देऊ, असे सांगत असले तरी त्या नुकसानभरपाईमधून आम्हाला जमीन मिळणे अवघड आहे. हलगा-मच्छे बायपासचा हा जो पट्टा आहे त्यामध्ये बासमती, ऊस, कडधान्य तसेच भाजीपाला पिकविणारी जमीन आहे. अशी जमीन आम्हाला मिळणे अशक्य आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणाहून रस्ता करू नये, अशी विनवणी अनेकवेळा केली. पर्यायी मार्गही दाखविला. मात्र, केवळ हट्टापाई आमच्यावर अन्याय होत आहे, असा आरोप देखील करण्यात आला आहे. दरम्यान, न्यायालयामध्ये या रस्त्याबाबतचा खटला प्रलंबित आहे. असे असताना रस्ता केला जात आहे. त्यामुळे लोकशाही आहे की नाही? असा प्रश्नदेखील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. रस्ता करण्यासाठी कितीही प्रयत्न करू देत, मात्र आमचा अखेरपर्यंत त्याला विरोध असेल, आम्ही कधीही मागे हटणार नाही. येत्या चार दिवसांत बैठक घेणार असून तीव्र आंदोलन करणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी राजू मरवे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.