जिल्ह्यात 20.1 टक्के कमी पाऊस
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती : पत्रकारांशी साधला संवाद
प्रतिनिधी
बेळगाव
यंदा जिल्ह्यात मान्सून पावसाने ओढ दिल्याने पाणी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात 20.1 टक्के कमी पाऊस झाला असून 7 तालुक्यात पावसाअभावी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार जलाशयांमध्ये पिण्याच्या पाण्याचा साठा करण्यात येत आहे. नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले, कृष्णा नदीत 80 ते 90 हजार क्युसेक पाण्याची आवक होत असून हिप्परगी जलाशयात पाण्याचा साठा करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे आवक होत आहे, त्याप्रमाणे आवश्यक साठा करून जलाशयांमधून पाणी सोडण्यात येत आहे. हिडकल जलाशयात 25 टीमएमसी पाण्याचा साठा असून जलाशयात 13 हजार क्युसेक पाण्याची आवक होत असून 1 टीएमसी पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
पाऊस झाला नसल्याने मलप्रभामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मलप्रभामध्ये 14 टीएमसी पाणीसाठा असून पाण्याची आवकही होत आहे. हा साठा कमी असून पाऊस झाल्यास आवकप्रमाणे साठा करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राध्यान्य देण्यात येणार असून यानंतर इतर बाबींसाठी पाणी दिले जाईल. शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर पेरणी केली असली तरी पावसाअभावी पिके संकटात आली आहेत. आता पिके वाचविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून सलग दोन ते तीन दिवस पाऊस झाल्यास पाण्याची समस्या निकाली निघेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले