शिये फाटा येथे अपघातात 2 तरुण ठार! भरधाव मोटारसायकलची धडक
पुलाची शिरोली वार्ताहर
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शिये फाटा येथील दुर्गामाता हॉटेल समोर भरधाव मोटारसायकलच्या धडकेत दोन तऊण ठार झाले. सचिन ऊर्फ पोपट कुमार चौगुले (वय 40, रा. किणी, ता. हातकणंगले), सौरभ संजय साळोखे (वय 30, रा. हरी पूजापुरम नगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात रविवारी दुपारी साडेतीन वाजता घडला.
सौरभ साळोखे हा स्पोर्टस मोटारसायकलवरुन कोल्हापूरकडून सादळे-मादळे येथे जात होता. दरम्यान, सचिन चौगुले हा महामार्गावरील दुर्गामाता हॉटेल समोर अचानक मोटारसायकलच्या आडवा आला. त्यामुळे ताबा सुटल्याने मोटारसायकलची सचिनला जोराची धडक बसली. या धडकेत त्याच्या डोक्याला मार लागून जागीच ठार झाला. तर मोटारसायकलस्वार सौरभ हा सुमारे दीडशे फूट लांब उडून पडला. त्यामुळे त्याच्याही डोक्याला जबर मार लागला. त्याला शिरोली एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ कोल्हापुरातील सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. पण उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सौरभ साळोखे यांचे वडील संजय साळोखे यांचा शिरोली औद्योगिक वसाहती शेजारी हनुमाननगर येथे व्यवसाय असून त्यांचे सादळे मादळे (ता. करवीर) येथे फार्म हाऊस बांधण्याचे काम सुरू आहे. तेथे सौरभ मोटारसायकलवरुन जात होता. तर सचिन चौगुले हा शिरोली औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामाला होता. दुपारी तो कामावर जाण्यासाठी किणी येथून वडापच्या वाहनातून आला होता. महामार्ग ओलांडून दुर्गामाता हॉटेल समोरुन शिये फाट्याकडे जात असताना भरधाव मोटारसायकलची त्याला धडक बसली. त्यात तो जागीच ठार झाला. तो अविवाहित असून एकुलता एक होता. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने आई, वडिलांचा आधार हरपला आहे.
संजय साळोखे यांचा मुलगा सौरभ सिव्हील इंजिनिअर होता. तो वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता. तर दुसरा मुलगा अमेरिका येथे शिक्षण घेत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. तपास महेश घाटगे करीत आहेत.