वडूज येथे अपघातात 2 युवक ठार; 7 जण जखमी
वडूज :
वडूज-दहिवडी रस्त्यावर असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिराजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात होऊन 2 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाल्याची घटना घडली. प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतार, शिवम हणमंत शिंदे (दोघे रा. औंध) अशी अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत.
याबाबत वडूज पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती की, सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वडूज-दहिवडी रस्त्यावर असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिराजवळ स्विफ्ट गाडी (एम. एच. 3- डी. ए. 7354) मधील चालक मयत प्रसाद सुतार याने त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगाने चालवून ओमनी गाडी (एम. एच. 14- डी. एन. 2758) ला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यावेळी दहिवडीहून वडूजकडे जाणाऱ्या पिकअप गाडी (एम. एच. 11- सी. एच. 3342) ला समोरून जोराची धडक दिली. त्यामध्ये स्विफ्ट गाडीतील प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतार, शिवम हणमंत शिंदे (रा. औंध) हे मृत्यू झाले. तर मनोज शंकर रणदिवे, सत्यम राजेंद्र खैरमोडे (दोघेही रा. औंध) हे जखमी झाले. याशिवाय पिकअप गाडीतील लालासो परशुराम पाटोळे, ज्योती लालासो पाटोळे (दोघेही रा. दरजाई) तसेच ओमनी गाडीतील रोहन आप्पासाहेब भिसे, आकाश सोनबा बर्गे, धनाजी आबाजी सुळे (रा. पिंपळवाडी, ता. खटाव) असे एकूण सात जण जखमी झाले. याबाबत धनाजी सुळे यांनी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक घन:श्याम सोनवणे करीत आहेत.
- औंधमध्ये व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली
औंध गावात शोककळा अपघातात मृत्यू पावलेला शिवम हा माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी हणमंतराव शिंदे यांचा तर प्रसाद सुतार हा औंध शिक्षण मंडळातील कर्मचारी राजेंद्र सुतार यांचा मुलगा आहे. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. तर मंगळवारच्या आठवडा बाजारांसह गावातील संपूर्ण व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.