एका दिवसात 2 हजार भूकंप
चालू महिन्याच्या प्रारंभी पॅनडाच्या किनाऱ्यानजीक असलेल्या व्हँकुव्हर बेटाच्या व्हिक्टोरिया हार्बरमध्ये अजब घटना घडली. 24 तासांत 2 हजार भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर वैज्ञानिकांनी अधिक संशोधन केले असता धक्कादायक खुलासा झाला. या सर्व भूकंपांचे केंद्र एंडीवर येथे होते. हे ठिकाण व्हँकुव्हर बेटापासून 240 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रात असलेल्या एंडीवर ठिकाणी अनेक हायड्रोथर्मल वेंट्स आहेत. म्हणजेच तेथे समुद्रातील तप्त वायू, लाव्हा बाहेर पडत असतो. हे वेंटस जुआन डे फुका रिजवर असून तेथेच समुद्राचा तळ दोन हिस्स्यांमध्ये विभागला जातो.
युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनचे डॅक्टोरल कँडिडेट जो क्रॉस यांनी हा पूर्ण भाग एक सबडक्शन झोनपासून वेगळा होतो, असे सांगितले आहे. म्हणजेच येथे एक टेक्टोनिक प्लेट दुसऱ्या प्लेटच्या खाली सरकत आहे. जर ही घटना किनाऱ्यानजीक सातत्याने घडत राहिल्यास अत्यंत मोठे अणि नुकसानदायक भूकंप होऊ शकतात, यामुळे कॅनडाला धोका निर्माण होणार आहे. समुद्राच्या मध्यात असलेल्या रिजवर होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या भौगोलिक हालचालीमुळे 5 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो. सध्या तरीही असा धोका दिसून येत नाही. परंतु समुद्राच्या तळात क्रस्टची नवी निमिर्ती होत आहे, किंवा तेथे काही बदल होत आहेत असे मानण्यास वाव असल्याचे जो क्रॉस यांनी म्हटले.
समुद्रातील जमीन प्रत्यक्षात क्रस्टच्या निर्मिती आणि बदलाला मदत करत आहेत. यामुळे दीर्घ भेगा, फॉल्ट लाइन्स तयार होतात. यात अंतर येणे किंवा अंतर कमी होण्यासारख्या घटना घडत असतात. यामुळे मँटलखाली तप्त लाव्हा किंवा मॅग्मा बाहेर पडतो. जेव्हा हा मॅग्मा वर येऊन थंड होतो, तेव्हा नवी लेयर तयार होते, म्हणजेच क्रस्टमध्ये निर्माण होणाऱ्या नव्या लेयरचा जन्म होतो. एंडीवर ठिकाणाला सातत्याने नॉर्थ-ईस्ट पॅसिफिक टाइम सीरिज अंडरसी नेटवर्क्ड एक्सपेरिमेंट अंतर्गत मॉनिटर केले जाते. याचे संचालन ओशन नेटवर्क कॅनडाकडून केले जाते. 2018 पासून या भागात मोठ्या प्रमाणात भूकंप होत आहेत. 6 मार्च रोजी दर तासाला 200 भूकंप झाले आहेत. दिवसभरात एकूण 1850 पेक्षा अधिक भूकंप झाले. हे भूकंप रिश्टर स्केलवर एक किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे होते. परंतु भीतीदायक बाब म्हणजे भूकंपाची संख्या आहे. एंडीवर साइटवर अत्यंत मोठा भूगर्भीय दबाव तयार होत आहे, यामुळे दोन प्लेट्स एकमेकांपासून सुमारे साडेतीन फूट अंतरावर गेल्या आहेत. तेथून बाहेर पडणारा मॅमा नवी क्रस्ट लेयर तयार करत आहे.