पाकिस्तानात प्रदूषणामुळे 20 लाख लोक आजारी
केवळ लाहोरमध्येच 12 लाख लोकांची रुग्णालयात धाव
वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वायू प्रदूषणामुळे गोंधळ उडाला आहे. याचा सर्वाधि क प्रभाव पंजाब प्रांतातील सर्वात मोठे शहर लाहोरमध्ये दिसून येत आहे. परंतु पूर्ण प्रांतच वायू प्रदुषणामुळे प्रभावित झाले आहे. स्थिती बिघडल्याने आणि वायू प्रदूषणाच्या तावडीत सापडल्याने सुमारे 20 लाख लोक आजारी पडले असून ते उपचारासाठी रुग्णालयात पेहोचले आहेत. पाकिस्तानच्या पंजाबमधील आरोग्य विभागानुसार प्रदूषणाने पीडित 19 लाख 34 हजारांहून अधिक लोकांनी रुग्णालयांमध्ये धाव घेतली आहे. यातील 12 लाख लोक केवळ लाहोर किंवा त्याच्या आसपासच्या भागांमधील रहिवासी आहेत. यातील बहुतांश लोकांना श्वसनावेळी त्रास होता. तसेच छातीत जळजळ जाणवत होती.
लाहोर अन् मुल्तान यासारख्या शहरांमध्ये तेथील सरकारने आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली असून कारखान्यांसाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. तर आठवड्यातील तीन दिवस शुक्रवार, शनिवार आणि रविवारी लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे.
गंभीर चिंता व्यक्त होऊनही लाहोरमध्ये वायू गुणवत्ता निर्देशांक 1000 च्या पारच आहे. गुरुवारी रात्री तर हे प्रमाण 1100 वर पोहोचले होते. मागील दोन आठवड्यांमध्ये लाहोर समवेत पूर्ण पंजाब प्रांतातील स्थिती खराब राहिली आहे. मुल्तान शहरातही प्रदूषणाने टोक गाठले असून तेथे वायू गुणवत्ता निर्देशांक दोनवेळा 2000 च्या पार गेला होता. संकट तीव्र झाल्याने लाहोरमध्ये सरकारने लोकांना घरातच थांबण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आवश्यक काम असेल तरच घरातून बाहेर पडण्यास सांगितले आहे. याचबरोबर मागील वर्षाच्या तुलनेत लाहोरमध्ये प्रदूषणाची पातळी 23 टक्क्यांनी अधिक वाढल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.
वायू प्रदूषणामुळे लोकांना श्वास घेताना क्षास होत आहे. तसेच मानसिक विकारही उद्भवत आहेत. अनेक लोकांना नैराश्यासारखी समस्या ही वायू प्रदूषणामुळेच झाली आहे. मुलांच्या विकासावरही याचा प्रभाव दिसून येत आहे. पाकिस्तानात पहिल्यांदाच प्रदूषणामुळे आजारी पडलेल्या लोकांचा आकडा एकत्र करण्यात आला आहे. या डाटामध्ये श्वसनाची समस्या, हृदयविकार, स्ट्रोक किंवा डोळ्यांमध्ये जळजळ यासारख्या आजारांना सामील करण्यात आले आहे.
हा डाटा लोकांच्या आरोग्यावर पडणाऱ्या प्रभावाचे अचूक चित्र मांडत नाही, परंतु प्रदूषणामुळे मोठ्या संख्येत लोक प्रभावित होत असल्याचा संकेत देत ओ. तर मोठ्या संख्येत लोक त्रास जाणवत असूनही रुग्णालयांमध्ये जात नाहीत, अशाप्रकारचे लोक घरातच वेगवेगळ्या प्रकारे स्वत:ची प्रकृती सुधारण्याचा प्रयत्न करत असतात. अशाप्रकारच्या लोकांचा आकडा जमविल्यास प्रदूषणाने प्रभावित होणाऱ्या लोकांची संख्या खूपच अधिक वाढणार आहे.
भारतातील पंजाबवर फोडले खापर
पाकिस्तानने स्वत:च्या क्षेत्रातील वायू प्रदूषणासाठी भारतातील पंजाब जबाबदार असल्याचा दावा केला आहे. पंजाबमधील शेतकरी काडीकचरा जाळत असल्याने वायू प्रदूषणाची समस्या विक्राळ झाल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. तर भारतातील पंजाब सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणखी काही दिवस वायू प्रदूषणाची समस्या तीव्र राहणार असल्याचा अनुमान तज्ञांनी व्यक्त केला आहे.