आघाडीवरच्या २ आयटी कंपन्यांकडून तिमाहीत १० हजार जणांची कपात
आघाडीवरच्या 2 आयटी कंपन्यांकडून तिमाहीत 10 हजार जणांची कपात
वृत्तसंस्था, बेंगळूर
जानेवारी ते मार्च या तिमाहीत भारतातील आघाडीवरच्या पाच आयटी सेवा कंपन्यांपैकी 3 कंपन्यांनी तिमाही आधारावर कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ केलेली आहे तर दुसरीकडे 2 आयटी कंपन्यांकडून 10 हजार जणांची कपात करण्यात आली आहे. तीन कंपन्या जसे की टीसीएस, एचसीएल टेक आणि विप्रो यांनी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली तर दुसरीकडे इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांनी कर्मचाऱ्यांची कपात केलेली दिसून आली आहे.
3293 जणांची भरती
आयटी कंपन्या सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशीयल इंटेलिजन्सच्या उद्दिष्टपूर्तीकडे अधिक जातीने लक्ष देत आहेत. याचा कमी अधिक दबाव सध्याला भारतीय आयटी कंपन्यांमध्ये दिसतो आहे. जानेवारी ते मार्च कालावधीत टीसीएसने तिमाही आधारावर 2356 कर्मचारी घेतले आहेत. मार्च अखेरपर्यंत कंपनीत 5,84,519 कर्मचारी आहेत. संपूर्ण आर्थिक वर्षात 23 हजार कर्मचाऱ्यांची उणिव जाणवली आहे. आर्थिक वर्षामध्ये 12 हजार जणांना काढले आहे. याच तिमाहीमध्ये एचसीएलटेकने तिमाही आधारावर 802 जणांना भरती करुन घेतले आहे. मार्च अखेरपर्यंत कंपनीत असणाऱ्यांची संख्या 2,27,181 इतकी होती. विप्रोने सदरच्या तिमाहीत 135 जणांना कंपनीत सामावून घेतले आहे.
10 हजार जणांची कपात
मार्च 2026 अखेर कंपनीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 2,42,156 इतकी आहे. इन्फोसिसने जानेवारी-मार्च तिमाहीत 8440 जणांना कमी केले आहे. वर्षाच्या आधारावर मात्र 5 हजार कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली आहे. मार्च अखेरपर्यंत 3,28,594 इतकी कर्मचाऱ्यांची संख्या राहिली आहे. टेक महिंद्राने या तिमाहीत 1993 कर्मचाऱ्यांना गमावले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात 1108 कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवली आहे. मार्चअखेरपर्यंत 1,47,623 इतके कर्मचारी कंपनीत कार्यरत आहेत.
तंत्रज्ञान उद्योगात 1 लाख 35 हजार जणांना संधी
नेस्कॉम यांच्या ताज्या माहितीनुसार भारत तंत्रज्ञान उद्येगामध्ये आर्थिक वर्ष 2026 मध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत 2 हजार जणांना नव्याने नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. एकूण पाहता 1 लाख 35 हजार कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यात आले आहे. आर्थिक 2025 मध्ये 1 लाख 33 हजार जणांना या उद्योगाने सामावून घेतले होते. याचाच अर्थ भरतीमध्ये वाढ केली जात आहे आणि हे चांगले लक्षण मानले जात आहे. टेक उद्योगातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या आर्थिक वर्ष 2026 मध्ये 59.5 लाख झाली आहे. मागच्या वर्षी ती 58.2 लाख इतकी संख्या होती.